पणजी : जगभरात प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या फ्रँक ओ कोन्नोर आंतरराष्ट्रीय कथा साहित्य पुरस्कारासाठी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गोव्याचे ज्येष्ठ कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांच्या ‘तेरेसास् मॅन अॅण्ड अदर स्टोरीज फ्रॉम गोवा’ या अनुवादित लघुकथा संग्रहाला नामांकन मिळाले आहे. ही घटना केवळ कोकणीच नव्हे तर भारतीय साहित्यविश्वासाठी लक्षणीय मानली जाते. एकूण चार भारतीय लेखकांच्या लघुकथा संग्रहांना या पुरस्कारासाठी नामांकने मिळालेली आहेत. फ्रँक ओ कोन्नोर पुरस्काराच्या अकराव्या आवृत्तीत चार भारतीय साहित्यिकांच्या लघुकथांचा समावेश झालेला आहे. इतर तीन भारतीयांमध्ये सिद्धार्थ गिगू यांचा ‘अ फिस्टफुल आॅफ अर्थ अॅण्ड अदर स्टोरीज’, सायरस मिस्त्री यांचा ‘पॅशन फ्लॉवर’ व संदीप रॉय यांच्या ‘डोण्ट लेट हिम क्नो’ या लघुकथा संग्रहाचा समावेश आहे. जगभरातील ९0 लघुकथा संग्रहांना या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेले आहे. त्यात अमेरिका, इंग्लंड, आॅस्ट्रेलिया आदी देशांमधील ख्यातनाम लेखकांच्या साहित्यकृतींचाही समावेश आहे. जागतिक ख्यातीचे लघुकथाकार फ्रँक ओ कोन्नोर यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार जगातील सर्वात मोठ्या रकमेचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. चालू महिन्याच्या उत्तरार्धात यातील ६ कथा निवडल्या जाणार आहेत. निवडलेल्या कथासंग्रहांची घोषणा जूनमध्ये तर पुरस्काराची घोषणा जुलैमध्ये केली जाईल. मावजो यांच्या कोकणी लघुकथांचा इंग्रजी अनुवाद झेवियर कोता यांनी केला असून रूपा पब्लिकेशनने हा लघुकथा संग्रह प्रकाशित केला आहे. ‘तेरेसास् मॅन अॅण्ड अदर स्टोरीज फ्रॉम गोवा’मधील कथांमध्ये समाजात आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांचे साधेभोळे जीवन प्रतिबिंबित होते. एका कथेत मावजो यांनी गरीब शेतकऱ्याला दारिद्र्यामुळे पाळलेली प्राणप्रिय जनावरे विकावी लागतात आणि त्या वेळी त्याला काय वेदना होतात याचे भावस्पर्शी चित्रण केलेले आहे. (पान २ वर)विशेष मुलाखत हॅलो १ वर
मावजो यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन
By admin | Published: May 04, 2015 1:24 AM