मडगाव: आतापर्यंत चार वेळा उद्घाटनाचा मुहूर्त हुकलेल्या मडगावातील नव्या दक्षिण जिल्हा इस्पितळाच्या उद्घाटनाचा आणखी एक मुहूर्त हुकण्याची शक्यता आहे. डिसेंबर अखेरपर्यंत हे इस्पितळ बांधून पूर्ण करून प्रजासत्ताक दिनी त्याचे उद्घाटन होणार अशी घोषणा यापूर्वी करण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आता मे महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कशाही रितीने डिसेंबर 2018 पर्यंत हे काम पूर्ण करू, अशी आम्हाला अपेक्षा होती. मात्र शेवटच्या क्षणी काही बदल सुचविल्यामुळे हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी पाच महिने जावे लागणार आहेत. कुठल्याही परिस्थितीत एप्रिल - मे महिन्यापर्यंत या प्रकल्पाचे पूर्ण होईल, अशी माहिती गोवा साधन सुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पाऊसकर यांनी दिली.या इस्पितळाचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. मे महिन्यापर्यंत उरलेले दहा टक्के काम पूर्ण करून आम्ही हा प्रकल्प आरोग्य खात्याकडे सुपूर्द करू, असे पाऊसकर यांनी सांगितले. या इस्पितळात अद्याप एका ऑपरेशन थिएटरचे आणि वैद्यकीय गॅस पुरवठा यंत्रणा बसविण्याचे काम बाकी राहिलेले आहे. या इस्पितळात एकूण 9 ऑपरेशन्स थिएटर्स असतील. दक्षिण गोव्यातील सहा तालुक्यासाठी या जिल्हा इस्पितळाचा वापर केला जाणार आहे. दरम्यान, राहिलेले काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी स्थानिक आमदार असलेले नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांच्याकडे सल्लामसलत करून लवकरच कामाला गती आणली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्र्वजित राणे यांनी दिली. मडगावातील हॉस्पिसियो हे जिल्हा इस्पितळ अगदी जीर्ण अवस्थेत चालू असल्याने लवकरात लवकर हे नवीन इस्पितळ सुरू व्हावे, अशी जिल्ह्यातील सर्व लोकांची मागणी आहे.
दक्षिण गोव्यातील जिल्हा इस्पितळ पूर्ण होण्यासाठी मे महिन्यांपर्यंत अवकाश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 7:19 PM