मडगाव: मडगाव पालिकेत विकासकामांची निविदा जाहीर करताना 3.65 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपवजा वृत्ताची गोवा लोकायुक्त पी. के. मिश्रा यांनी स्वेच्छा दखल घेताना या निविदा जारी करणाऱ्या मडगावच्या नगराध्यक्ष पूजा नाईक आणि मुख्यधिकारी अजीत पंचवाडकर याना प्रतिवादी करण्याचा आदेश दिला.
दरम्यान, शुक्रवारी नगरपालिका प्रशासन संचालक तारिक थॉमस यांनी लोकायुक्तांच्या कार्यालयात जो अहवाल सादर केला आहे त्यात या तक्रारीची दखल घेऊन ही सर्व कामे स्थगित ठेवण्याचा आदेश दिल्याचे म्हटले असून 11 कामांच्या खर्चाची रक्कम एकचसारखी कशी याचा खुलासा मडगाव पालिकेकडून मागितला असल्याचे म्हटले आहे. ज्या 64 कामासाठी निविदा जारी केल्या होत्या त्याठिकाणी यापूर्वी कामे झाली आहेत का याची खातरजमा सूडाच्या प्रकल्प अभियंत्याकडून केली जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. ही नोटीस 28 मे रोजी मडगाव पालिका मुख्याधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे.
मडगावच्या शेडो कौन्सिलने हा कथित भ्रष्टाचार उघडकीस आणला होता. पालिका मंडळाची मान्यता नसताना 3.65 कोटींच्या कामाची निविदा जारी केल्याचा आरोप केला होता. कित्येक ठिकाणी आधी कामे झालेली असतानाही त्याच कामासाठी नवीन निविदा जारी केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. या संबंधी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर लोकायुक्तांनी त्याची स्वेच्छा दखल घेत नगरपालिका प्रशासन संचालकांना चौकशी करण्याचा आदेश दिला होता.
दरम्यान, शेडो कौन्सिलचे सावियो कुतीन्हो यांनी याबद्दल लोकायुक्तांचे आभार मानले असून मडगावच्या करदात्यांचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.