पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालय व गोवा दंत महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया (काउन्सिलिंग) ठरल्याप्रमाणे १६ जून रोजी न करता, १७ जूनपर्यंत कोणताही निर्णय न घेण्याची सूचना करणारे पत्र गोमेकॉने गोवा तांत्रिक शिक्षण संचालनालयाला (डीटीई) लिहिले आहे. प्रवेश प्रक्रियेतील गोंधळासंबंधी ‘लोकमत’मधून मंगळवारी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर गोमेकॉने तातडीची बैठक घेऊन डीटीईला पत्र लिहिले. १७ जून रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या समाजकल्याण खाते, मेडिकल काउन्सिल आॅफ इंडिया, आरोग्य मंत्रालय आणि विविध राज्यांच्या आरोग्य सचिवांच्या संयुक्त बैठकीनंतरच काउन्सिलिंगची तारीख ठरणार आहे. एमबीबीएस व बीडीएसची प्रवेश प्रक्रिया कशी करावी, यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला गोंधळ कायम आहे. १६ जून रोजी ठरलेले काउन्सिलिंग आता पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेश देतानाच काउन्सिलिंगसाठी वेळापत्रक बनविण्यासही सांगितले होते. ते वेळापत्रक तयार केले नसल्यामुळे हा गोंधळ झाला आहे. १७ जून रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या बैठकीत ते ठरण्याची शक्यता असून त्यानंतरच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहेत. या बैठकीला गोव्यातून आरोग्य सचिव उपस्थित राहणार आहेत. १७ जून रोजी होणाऱ्या बैठकीत काउन्सिलिंगच्या वेळापत्रकाबरोबरच इतर विषयांवरही चर्चा होणार आहे. त्यात ‘नीट’ व अध्यादेश या पार्श्वभूमीवर चर्चा होऊन निर्णय, एमबीबीएस, पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी जागा वाढविणे व इतर विषयांवर चर्चा होणार आहे. गोवा तांत्रिक शिक्षण खात्याच्या सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)
एमबीबीएस, बीडीएस काउन्सिलिंग लांबणीवर
By admin | Published: June 15, 2016 1:39 AM