खाण अवलंबिता बरोबर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतलेली बैठक फार्सच; काँग्रेसचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 08:06 PM2020-10-16T20:06:42+5:302020-10-16T20:06:50+5:30
खाणी सुरु करण्यास होणाऱ्या विलंबाबाबत मुख्यमंत्री केवळ कारणेच देत आहे.
मडगाव: खाण अवलंबितांसोबत डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतलेली बैठक म्हणजे खाण उद्योग सुरु करण्यासाठी आणखी मुदत मागून घेण्यासाठीचा फार्स होता, अशी टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
खाणी सुरु करण्यास होणाऱ्या विलंबाबाबत मुख्यमंत्री केवळ कारणेच देत आहे. खाणी सुरु करण्याचा सरकारचा उद्देशच नसल्याने शुक्रवारी खाण अवलंबितांसोबतच्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही, असे मत चोडणकर यांनी व्यक्त केले. बहुचर्चित दिल्ली भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या सोबत झालेल्या बैठकीच्या संदर्भातील वक्तव्याचा मुख्यमंत्र्यांना सोयीस्कर विसर पडला असे त्यांनी सांगितले.
खाण पट्ट्यातील जनतेची आर्थिक स्थिती सुधारावी असे वाटत नसल्यानेच भाजपला खाणी सुरु करण्याची इच्छाशक्तीच नाही असे मुख्यमंत्र्यांनी कबूल करावे. लोकांना गरीब ठेवून निवडणुकीच्या वेळी त्यांचा वापर करावा अशी भाजपची रणनिती आहे, असा आरोप चोडणकर यांनी केला. तथापि, खाण अवलंबितांमध्ये भाजपच्या विरोधात असंतोष खदखदत असून भाजपचा हा डाव यशस्वी होणार नाही, असे भाष्य चोडणकर यांनी केले.
2012 पासून या विषयावर पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय वन व पर्यावरण मंत्र्यांसोबत बैठकांमागून बैठका घेण्याचा फार्स करण्यात येत आहे. त्या एेवजी खाणी सुरु करण्याचा निश्चित आराखडा भाजप प्रणित सरकारने जाहीर करावा अशी मागणी चोडणकर यांनी केली. केंद्रात व राज्यात भाजपचेच सरकार असताना खाणी सुरु करण्याबाबत कोणती अडचण आहे, असा सवाल त्यांनी केला.
ट्रक मालकांनी खनिज वाहतुकीसाठी योग्य दर मिळावा यासाठी केलेल्या मागणीकडे सरकारने काणाडोळा केला, अशी टिकाही त्यांनी केली. ट्रक मालकांना योग्य आर्थिक मदत न करता खनिज वाहतूक सुरु करणे निरर्थक आहे. खनिज वाहतुकीतील भाजपच्या दलालांना बाजुला सारून स्थानिकांना न्याय द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. आणखी विलंब न करता खाण व्यवसाय सुरु करण्याची तारीख सरकारने निश्चित करावी, अन्यथा हे सरकार खाण व्यवसाय सुरु करू शकत नाही, असे जाहीर करावे अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे.