लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात उमेदवार शॉर्टलिस्ट करण्यासाठी भाजप पुढील दोन दिवसांत बैठकीची दुसरी फेरी घेणार आहे. महिला उमेदवाराचा शोध घेण्याचे काम चालू आहे. निवडणूक अधिसूचना जारी होईपर्यंत आमचा दक्षिणेचा उमेदवार निश्चितच जाहीर केला जाईल, असे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी स्पष्ट केले.
तानावडे म्हणाले की, संभाव्य उमेदवाराचे नाव आम्ही जाहीर केलेले नाही. दक्षिण गोव्यातील महिला उमेदवार शॉर्टलिस्ट करण्यासाठी पुढील दोन दिवसांत बैठक होईल. केंद्रीय निवडणूक समितीचीही दुसरी बैठक अद्याप व्हायची आहे.
देशभरात मोदी सरकार महिलांना प्राधान्य देत आहे. ३३ टक्के राखीवतेचे विधेयकही संमत केले. प्रत्यक्षात ते लागू होईपर्यंत आणखी दोन ते तीन वर्षे जातील. २०२७ च्या विधानसभेत हे आरक्षण मिळू शकेल. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी अधिकाधिक महिला उमेदवार देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला असून, त्या अनुषंगाने दक्षिण गोव्यातून महिला उमेदवारांची नावे पाठविण्यास सांगितले आहे. पूर्वी पाठविलेली तीन अधिक महिलांची नावे आम्ही पाठवू, असेही तानावडे म्हणाले.
दरम्यान, मी अपक्ष म्हणूनच राहिलो. भाजप सोडला तरी अन्य कुठल्याही पक्षात गेलो नाही. आता कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की मी भाजपप्रवेश करावा. या बाबतीत मी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, तसेच प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याकडे बोललो असून, मुख्यमंत्र्यांना वेळ मिळेल त्यानुसार सावर्डेत मी पक्षप्रवेश करणा आहे ?. भाजपचे आमदार गणेश गांवकर यांच्याकडे आपले मित्रत्त्वाचे संबंध आहेत, त्यामुळे कोणतीही अडचण येणार नसल्याचे माजी बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर म्हणाले.
बूथांवर काम चालूच
उमेदवार जाहीर झालेला नाही याचा अर्थ आमचे काम थांबलेले आहे, असे नव्हे. दक्षिण गोवा मतदारसंघातही प्रत्येक बूथवर आमचे काम चालू आहे. अनेकजण रोज पक्षप्रवेश करीत आहेत. परवा शिवोलीत १८५ जणांनी पक्ष प्रवेश केला. मयेंतही मोठ्या प्रमाणात लोकांनी भाजपात प्रवेश केला.
दीपक पाऊसकर लवकरच भाजपात
माजी बांधकाममंत्री दीपक पाऊसकर हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असून, येत्या लोकसभा निवडणुकीत आपला पाठिंबा भाजप उमेदवारालाच असेल, असे त्यांनी जाहीर केले आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी पक्षाला रामराम ठोकून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती.