नारायण गावस पणजी : बीच शॅक धारकांनी पर्यटन खात्याकडे मान्सून अद्याप सुरु झाला नसल्याने शॅक्स हटविण्याची ३१ मे ची अंतिम मुदत आणखी वाढविण्याची मागणी केली होती. याचा विचार करुन सोमवारपर्यंत हवामान विभागाशी चर्चा करुन योग्य निर्णय घेणार असल्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले.
मंत्री रोहन खंवटे यांनी शनिवारी सांगितले की, त्यांचे मागणे लक्षात घेऊन राज्य सरकार मुदत वाढविण्याचा विचार करत आहे. हवामानाच्या परिस्थितीनुसार मुदत वाढविली जाणार. आम्ही मुदत वाढवण्याचा निर्णय घेऊ पण शॅक मालकांनी पर्यटकांच्या सुरक्षेची खात्री केली पाहिजे, असे खंवटे म्हणाले.
मंत्री रोहन खंवटे म्हणाले की, राज्यातील हवामान पाहता पर्यटन खात्याने शॅक्सना ३१ मे ही अंतिम मुदत दिली होती. परंतु सध्या देशी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. तसेच शॅक्स संघटनांनी मुदत वाढीची मागणी केली आहे. आम आदमी पक्षाचे आमदार व्हेंझी व्हिएगास यांनीही पत्र लिहून बीच शॅक्सची मुदत वाढवण्याची मागणी केली होती.
मंत्री खंवटे म्हणाले शॅक मालक, वॉटर स्पोर्ट्स ऑपरेटर, पारंपरिक मच्छीमार यांच्यासह संबंधितांनी एक इको-सिस्टीम म्हणून एकत्र काम केले पाहिजे. समुद्रकिनाऱ्यावर जे घडत आहे त्याची जबाबदारी संबंधितांनी घेतली पाहिजे. जर काही चूक झाली तर राज्य सरकारला दोष देण्याची प्रवृत्ती आहे. पर्यटन खात्याला संबंधितांची समस्या समजते आणि विभाग त्यांच्या पाठीशी आहे. खाते आगामी पर्यटन हंगामात समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटनाशी संबंधित नियम लागू होतील याची खात्री करेल.
सुरक्षित पर्यटन स्थळांचा आनंद घ्या
बंद खाणीत बुडून मृत्यू आणि इतर धोकादायक ठिकाणे विषयी बाेलताना मंत्री खंवटे म्हणाले, पर्यटकांनी जबाबदारीने वागावे प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे. धाेकादायक ठिकाणावर जाऊ नका असे आम्ही परिपत्रक काढले आहे.
खाण मालकांनी क्षेत्रांना कुंपण घालणे गरजेचे आहे पण तसे केले जात नाही. प्रत्येक गोष्टीसाठी सरकारला जबाबदार धरले जाते. युवकांनी सुरक्षित ठिकाणच्या पर्यटन स्थळांचा आनंद घ्यावा. एखादा तरुण बुडून मृत्यू हाेणे हे त्यांच्या कुटुंबाप्रमाणे राज्याचेही मोठे नुकसान आहे. पर्यटन खाते या विषयी जनजागृती करणार आहे.