लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर रिव्होल्यूनशनरी गोवन्स पक्षाने प्रचारावर भर दिला आहे. लोकसभेच्या निवडणुकीला काही दिवसच शिल्लक राहिल्याने, तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचारावर भर देण्यात येत आहे, असे सांतआंद्रेचे आमदार व आरजीचे नेते विरेश बोरकर यांनी सांगितले.
आमदार बोरकर म्हणाले की, 'सध्या राज्यातील सर्व मतदारसंघांत, तालुका पातळीवर आरजीची बैठक घेतली जात आहे. तालुका तसेच गट समित्यांचे सर्व कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची तयारी केली जात आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत सरकारचे अपयश आम्ही जनतेला दाखवून देणार आहोत. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने लोकांची कशी फसवणूक केली हे आम्ही लोकांना पटवून देणार आहोत. लोकांनीही आता बदलले पाहिजे. लोक भाजपच्या खोट्या आश्वासनांना कंटाळले आहेत.'
आमदार बोरकर म्हणाले की, 'भाजपने गोव्यात सुरू केलेली स्थानिकांच्या विरोधातील कामे लोकांना सांगितली जातील. वाढती बेरोजगारी, गुन्हेगारी, भ्रष्टाचार तसेच जमिनींची कशी बेकायदेशीर विक्री केली जात आहे हे लोकांसमोर प्रचाराच्या माध्यमातून मांडले जाईल. भाजप जातीयवादावर कसे मते मिळवते याविषयी लोकांना समजावून सांगितले जाईल.'
बेरोजगारी वाढली...
भाजप विकासाच्या नावावर मत मागत आहे, पण या विकासाचा स्थानिकांना काहीच फायदा झालेला नाही. बेरोजगारी वाढली आहे. बेरोजगारांना बेकारी भत्ता दिला जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, त्यांची फसवणूक केली गेली. विकासाच्या नावाखाली लोकांच्या शेतजमिनी विकल्या. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आम्ही हे सर्व विषय घेऊनचे निवडणुकीत भाजपविरोधी प्रचार करू, असे आमदार विरेश बोरकर म्हणाले.