पणजी : मगो पक्षाने जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी नऊपैकी आठ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. उसगांव, गांजे मतदारसंघाचा उमेदवार अजून ठरलेला नाही. मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारांची घोषणा केली. याप्रसंगी पक्षाचे नेते वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर, आमदार लवू मामलेदार, माजी मंत्री तथा ‘उटा’चे नेते प्रकाश शंकर वेळीप, केपेचे प्रकाश अर्जुन वेळीप तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. युतीमुळे नऊही उमेदवार निवडून आणण्यास सोपे जाईल, असा विश्वास ढवळीकर यांनी या वेळी व्यक्त केला. भाजपने नऊ मतदारसंघच दिले त्यावर समाधानी आहात काय असे विचारले असता, २0१२ साली आठ मतदारसंघांत मगोचे उमेदवार निवडून आले होते तेच मतदारसंघ आम्ही मागितले होते. मगोने गोव्यात १७ वर्षे राज्य केले, तसेच विधानसभेतही अस्तित्व टिकवून ठेवले आहे. हा पक्ष लोकांसाठी नवा नव्हे, असेही ते म्हणाले. सांताक्रुझमध्ये निशा दिलीप कवळेकर, चिंबलमध्ये संदीप प्रभाकर वेर्णेकर, प्रियोळमध्ये शिवदास गावडे, बेतकी-खांडोळा मतदारसंघात बबिता दत्तप्रसाद गावकर, सांकवाळमधून अपर्णा नाईक, बार्से मतदारसंघात विठोबा वेळीप, कुर्टी-खांडेपार मतदारसंघात मोहन वेरेकर, तर कवळे मतदारसंघात चित्रा प्रताप फडते, उसगाव-गांजे मतदारसंघातून भारत नाईक यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. शिवदास गावडे हे विद्यमान झेडपी असून वेरेकर हे मगोच्या केंद्रीय समितीचे सदस्य आहेत. (प्रतिनिधी)
मगोचे आठ उमेदवार जाहीर
By admin | Published: March 03, 2015 1:28 AM