पणजी: मेरशी येथील शेतांमध्ये रात्रीच्यावेळी सांडपाणी सोडणारा टँकर मेरशीचे सरपंच प्रमोद कामत व पंचायत सदस्य जयेश वेंगुर्लेकर यांनी मंगळवारी पकडला. याप्रकरणी पंचायतीने पोलिसांत तक्रार दिली आहे.
शेतांमध्ये अशाप्रकारे सांडपाणी सोडण्याच्या प्रकारावर सरपंचांनी तीव्र संताप व्यक्त केला. सदर प्रकार खपवून घेतले जाणार नाही. याविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. शेतात सांडपाणी सोडण्यासाठी टँकर येणार याची माहिती मिळताच सापळा रचून सरपंच कामत व पंचायत सदस्य वेंगुर्लेकर यांनी ही कारवाई केली.
कामत म्हणाले, की मेरशी येथील पंचायत क्षेत्रातील शेतांमध्ये मागील काही दिवसांपासून काही टँकर रात्रीच्यावेळी येऊन सांडपाणी सोडत असल्याची तक्रार काही जणांनी पंचायतीकडे तोंडी केली होती. मागील काही दिवसांपासून सांडपाणी सोडण्याचा प्रकार सुरु असून काहीवेळा तर दिवसाला १० ते १५ टँकर सुध्दा सांडपाणी सोडले जात असल्याची माहिती काही नागरिकांनी पंचायतीला दिली होती. त्यानुसार मंगळवारी सदर प्रकार रोखण्यासाठी आम्ही सापळा रचला व टँकर पकडला असे त्यांनी सांगितले.