लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात कुणाला तिकीट द्यावे, याविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. गोव्यात एसटींना राजकीय आरक्षण देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकताच निर्णय घेतल्याने, याच भेटीवेळी मुख्यमंत्र्यांनी शाह यांचे आभार मानले.
गोव्यातील भाजपसमोर सध्या दक्षिण गोव्यात कोणत्या महिला उमेदवाराला तिकीट देण्यासाठी नावाची शिफारस करावी, हा पेच आहे. सक्षम महिला उमेदवार मिळत नाही, असे गोवा भाजपला वाटते. मुख्यमंत्री सावंत यांनी ही भावना शाह यांच्यापर्यंत पोहोचविली असल्याची माहिती मिळाली. शाह हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी याबाबत बोलतील व काय तो तोडगा काढतील, असे पक्ष सूत्रांनी सांगितले. समर्थ महिला उमेदवार मिळत नसेल, तर दामू नाईक, बाबू कवळेकर व नरेंद्र सावईकर या तिघांपैकी एकाला तिकीट द्यावे, अशी गोवा भाजपची भूमिका असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुख्यमंत्री सावंत यांनी एसटींच्या आरक्षणाचा विषय यापूर्वीच केंद्राकडे पोहोचविला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाने लगेच त्याविषयी निर्णयही घेतला व नवे विधेयक संसदेत मांडावे, असे ठरवले. मुख्यमंत्री सावंत यांनी याबाबत पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शाह या दोघांचेही आभार मानले आहेत.