पणजी : राज्यात भूजल वापराचे सरकारने नियमन करण्याचे ठरविले असून भूजलाचा वापर करणाऱ्या प्रत्येकास मीटरसक्ती करण्यात येणार आहे. तशी तरतूद असलेले धोरण राज्य मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आले. या धोरणानुसार आता राज्यातील विहिरींची नोंद करावी लागणार आहे. नव्या विहिरींसाठी नोंदणी सक्तीची झाली आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीवेळी पंचायत राज कायदा दुरुस्तीसंबंधीच्या तरतुदीही मंजूर करण्यात आल्या. यापूर्वी वटहुकूम काढण्यात आला होता. त्यास येत्या विधानसभा अधिवेशनात मान्यता घेतली जाणार आहे. डॉक्टर भरती, काही अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर सेवावाढ, असेही काही निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. मंत्रिमंडळाने आपत्कालीन निधीत ३० कोटी रुपयांवरून १०० कोटी रुपयांपर्यंत वाढ केली आहे. तसेच अटल ग्राम योजनेसाठी एक सोसायटी स्थापन करावी, असेही ठरले आहे. (खास प्रतिनिधी)
भूजल वापरासाठी मीटरची सक्ती
By admin | Published: March 14, 2015 12:44 AM