ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. १२ - महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाने सत्ताधारी भाजपसोबतची युती तोडावी व आपल्यासोबत यावे, असे आवाहन यापूर्वी भारतीय भाषा सुरक्षा मंचने केले तरी, शिक्षणाच्या माध्यम प्रश्नाचा विषय घेऊन आपण भाभासुमंसोबत जायचे नाही, असे म.गो. पक्षाच्या केंद्रीय समितीमध्ये तत्त्वत: ठरले आहे. म.गो. भाभासुमंसोबत जाणार नाही हे भाजपसाठीही दिलासादायी ठरले आहे.
प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघात बंड झाले आहे. संघ स्वयंसेवक संघटीतपणे वेलिंगकर यांच्यासोबत आहेत. भारतीय भाषा सुरक्षा मंच व संघाची शक्ती एकत्र आली आहे. शिवसेनेचे बळ कमी असले तरी, सेनेनेही भाषा सुरक्षा मंचला पाठींबा दिला आहे. यापूर्वी भाषा सुरक्षा मंचच्या धोरणाशी म्हणजे इंग्रजी शाळांचे अनुदान बंद व्हावे या मागणीशी म.गो. पक्षाने सहमती दर्शविली तरी, येत्या निवडणुकीवेळी मात्र भाजपसोबत युती ठेवूनच निवडणुका लढवाव्यात असे म.गो. मध्ये ठरले आहे.
त्यात आणखी बदल होणार नाही, असे केंद्रीय समितीच्या काही सदस्यांनी सांगितले. म.गो. पक्षाने येत्या निवडणुकीसाठी भाजपकडे विधानसभेच्या चौदा जागा मागितल्या आहेत. जागा थोडय़ा कमी मिळाल्या तरी, भाजप व म.गो.ची युती तुटणार नाही याची कल्पना भाजपलाही पूर्णपणो आली आहे. एकंदरीत म.गो. पक्ष कोणत्याच स्थितीत भाभासुमंसोबत व वेलिंगकर यांच्या रा. स्व. संघासोबत जाणार नाही हे भाजपसाठी दिलासादायी आहे.
भाजपने केलेल्या सर्वेक्षणावेळी माध्यमप्रश्नाचा जास्त परिणाम होणार नाही असे आढळून आले आहे पण संघाचे बंड व भाभासुमंचे आंदोलन याचा परिणाम किती होऊ शकतो याचा अंदाज तूर्त भाजप घेत आहे. म.गो. पक्ष भाभासुमंसोबत जाणार याची काळजी संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर यांनी घेतली आहे. आमचा भाभासुमंला तात्त्विक पाठींबा असेल पण निवडणुकीच्या रिंगणात आम्ही भाभासुमंचा हात धरून उतरू शकत नाही, असे म.गो.च्या एका नेत्याने सोमवारी लोकमतला सांगितले. दरम्यान, नवे संघचालक नाना बेहरे यांचाही भाभासुमंला पाठींबा आहे. संघ स्वयंसेवकांना भाभासुमंच्या चळवळीत भाग घेण्यापासून रोखता येणार नाही. स्वयंसेवकांसाठी सर्व पक्ष समान आहेत, असे बेहरे यांनी एका वृत्त वाहिनीला सांगितले.