पणजी - मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी आपल्या धोरणात बदल करून, कर्नाटकच्या विरोधी पक्षनेते येडियुरप्पा यांना लिहिलेल्या द्विपक्षीय चर्चेच्या पत्रवरून पुन्हा एकदा ‘यु’ टर्न घेण्यात माहीर असल्याचे दाखवून दिले आहे, अशी टीका करीत गोवा सुरक्षा मंचच्यावतीने (गोसुमं) म्हादई नदीच्या पाण्याप्रश्नी प्रसंगी पणजीत भव्य मोर्चा काढण्याचा इशारा अध्यक्ष आनंद शिरोडकर यांनी दिला. दरम्यान, यावेळी त्यांनी पक्षाच्यावतीने करण्यात येणा:या आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.
गोसुमंच्यावतीने रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी पक्षाचे महासचिव आत्माराम गावकर, सचिव हरिश्चंद्र नाईक यांची उपस्थिती होती. शिरोडकर म्हणाले की, कासारपाल येथे नुकत्याच झालेल्या दोन दिवसीय कार्यशाळेत चाळीस मतदारसंघाचे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेत गोव्याच्या राजकारणात पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी लागणा:या सर्व सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या गाजत असलेल्या म्हादई नदीच्या पाणी प्रश्नावर पक्ष येत्या 27 डिसेंबरपासून पाच तालुक्यांत आंदोलन करणार आहे. दि. 27 रोजी डिचोली आणि सांगे, 28 रोजी मडगाव व म्हापसा, तर 30 रोजी फोंडय़ात आंदोलन होईल. जर वेळीच मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांनी आपली भूमिका बदलली नाहीतर पणजीत पक्षाच्यावतीने मोर्चा काढू, असा इशारा त्यांनी दिला. त्याचबरोबर या पक्षात जर या प्रश्नावर इतर पक्षांचे एकमत झाले तर त्यांनीही त्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
तत्पूर्वी शिरोडकर म्हणाले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री 14.88 टीएमसी पाणी गोव्याकडे मागत आहेत. तर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर हे विरोधी पक्षनेते येडियुरप्पा यांना पत्र लिहून द्विपक्षीय चर्चेस तयारी असल्याचे कळवितात. त्यावरून आत्तार्पयत कर्नाटकला पाणी देणार नाही, असे सांगणारे पर्रिकर कर्नाटकातील निवडणुका लक्षात घेऊन ‘यू’ टर्न घेतात. त्यामुळे त्यांचा खोटारडेपणा पुढे आला आहे. महाअभियोक्ता आत्माराम नाडकर्णी यांनी दिलेल्या स्पष्टीकरणातून पर्रिकर यांना उघडे पाडले आहे. गोव्यातील अनेक भाग पाण्यापासून वंचित आहे. पावसाळा संपला की अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा केला जातो. राज्यातील वाडय़ावस्त्यांचा पाणीप्रश्न सोडविण्याऐवजी र्पीकर कर्नाटकला पाणी द्यायला निघालेत, हे मोठे षडयंत्र आहे. आत्तार्पयत पर्रिकरांनी येथील जनतेला वेगवेगळी वक्त्यव्ये करून झुलवत ठेवले आहे. त्यांनी या शाब्दिक खेळ करीत आपला छुपा अजेंडा रेटण्याचा प्रयत्न चालविला असून, त्यांना केवळ खुर्चीचे प्रेम असून राज्यातील जनतेचे काहीही घेणोदेणो नाही.
अस्थिर सरकारचा बळी देणार!
केंद्रातील भाजप सरकारला गोव्यासारख्या छोटय़ा राज्याचे काही पडलेले नाही. कर्नाटक हे मोठे राज्य आहे, तेथे विधानसभेत सत्ता आणणो आणि लोकसभेच्या निवडणुका जिंकणो हे लक्ष्य त्यांचे आहे. त्यासाठी गोव्यात अस्थिर असलेल्या आघाडी सरकारचा बळी देण्याचा डाव असू शकतो. मिळालेल्या माहितीप्रमाणे दिल्लीत झालेल्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबरोबरच्या बैठकीत पर्रिकर यांच्यावर मोठा दबाव टाकण्यात आला असावा. त्यातूनच त्यांनी आपल्या धोरणात बदल केला असावा. हे सर्व कारस्थान कर्नाटकातील निवडणूक डोळ्य़ासमोर ठेवून चालले आहे, असे शिरोडकर म्हणाले.
सारखरम्राटांचा दबाव!
म्हादई नदीचे पाणी नेण्याचा डाव हा उत्तर कर्नाटकातील साखर सम्राटांचा डाव आहे. येथील ऊस शेतीला लागणारे पाणी कमी पडू लागल्याने ते म्हादईचे पाणी मागत आहेत. त्यासाठी कर्नाटक सरकारवर आणि विरोधी पक्षावरही या साखर कारखान्यांच्या मालकांचा दबाव असू शकतो, असेही शिरोडकर म्हणाले.