पणजी : म्हादई पाणीप्रश्नी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयाकडून कोणते पत्र येते ते पाहण्यासाठी गोवा सरकार आणखी आठ दिवसांची प्रतीक्षा करील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी येथे सांगितले.म्हादई पाणीप्रश्नी गोवा सरकारच्या भूमिकेवर पूर्ण गोव्याचे लक्ष आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळ अलिकडेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना भेटून आले. या पाश्र्वभूमीवर पत्रकारांनी विचारताच मुख्यमंत्री सावंत म्हणाले, की दहा दिवस थांबा असे केंद्र सरकारने आम्हाला सांगितले आहे. दोन दिवस झाले, आम्ही आणखी आठ दिवस प्रतीक्षा करू. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयाकडून पत्र आल्यानंतर ते पत्र आपण जाहीर करीन.मुख्यमंत्र्यांकडून नाटक : खंवटे दरम्यान, पर्वरीचे आमदार व माजी मंत्री रोहन खंवटे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री म्हादई पाणीप्रश्नी वेळकाढूपणा करून फक्त नाटक करत आहेत, अशी टीका खंवटे यांनी केली. मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्यामध्ये कळसा भंडुराप्रश्नी हातमिळवणी झालेली आहे. दोघांच्याही संगनमताने कळसा भंडुरा पाणीप्रश्नी निर्णय घेतला गेला आहे. कर्नाटकला अगोदरच जावडेकर यांच्या मंत्रलयाने पत्र दिले. मुख्यमंत्र्यांना त्याची अगोदरच कल्पना होती. आता त्यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेण्याचे नाटक केले. सध्या ते विविध विधाने करून केवळ वेळ मारून नेत आहेत, असे खंवटे म्हणाले. गोमंतकीयांना मुख्यमंत्र्यांनी वेडे समजू नये. म्हादई नदी जर त्यांची आई असेल तर ते आणखी आठ दिवस का म्हणून थांबतात ते कळत नाही, असेही खंवटे म्हणाले. म्हादई पाणीप्रश्नी जावडेकर यांनी गोव्याला कोणतेच ठोस आश्वासन दिले नाही. त्यामुळे खरे म्हणजे सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधान मोदी यांच्याकडे न्यायला हवे व तिथे न्याय मागायला हवा,असेही खंवटे म्हणाले.
म्हादईप्रश्नी आठ दिवस थांबू : मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 7:51 PM