लोकमत न्यूज नेटवर्क उसगाव : भविष्यात राज्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार असल्याचे सांगता, मग म्हादई नदीचे पाणी कर्नाटकला का वळवू दिले? असा प्रश्न जलस्त्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारत सोनारबाग रहिवाशांनी खांडेपार नदी बंधारा प्रकल्प होवू देणार नाही, अशी भूमिका मांडली. यावेळी लोकांनी तीव्र विरोध दर्शविल्याने पोलिस बंदोबस्तात सभा आटोपती घेण्यात आली.
सोनारबाग रहिवाशांसाठी रविवारी सकाळी उसगाव पंचायत सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत खांडेपार नदी पात्रात सोनारबाग ते मुर्डीपर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्याच्या आराखड्याची माहिती देण्यात आली.
सभेला जलस्त्रोत खात्याचे वरिष्ठ अभियंते प्रमोद बदामी, फोंडा जलस्त्रोत खात्याच्या विभाग ४चे सहाय्यक अभियंते शैलेश नाईक, फोंड्याच्या संयुक्त मामलेदार जान्हवी कालेकर, उसगावचे सरपंच नरेंद्र गावकर, उपसरपंच संगीता डोईफोडे, पंच गोविंद परब फात्रेकर विनोद मास्कारेन्स, राजेंद्र नाईक, प्रकाश ऊर्फ संजय गावडे उपस्थित होते.
बंधारा प्रकल्पाचा संपूर्ण नकाशा यावेळी प्रदर्शित करण्यात आला. प्रकल्पासंदर्भात सविस्तर माहिती सहाय्यक अभियंते शैलेश नाईक यांनी दिली. या प्रकल्पामुळे राज्यातील जनतेला मिळणाऱ्या फायद्याची माहिती खात्याचे वरिष्ठ अभियंते प्रमोद बदामी यांनी दिली. बंधारा प्रकल्पामुळे प्रियोळ मतदारसंघ तसेच आजूबाजूच्या , भागात भविष्यात उद्भवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करता येईल, असे ते म्हणाले.
सभा घेतली आटोपती
यावेळी खांडेपार नदीवर बंधारा होवू देणार नाही, हा एकच नारा सभेला उपस्थित असलेल्या सोनारबाग भागातील रहिवाशांचा होता. सभेच्या सुरुवातीपासूनच लोक आक्रमक होते. बंधारा नको असे म्हणत लोकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने पोलिस फौजफाटा बोलवण्यात आला. त्यानंतर काही वेळातच सभा आटोपती घेण्यात आली.
अहवाल देणार
भविष्यात लोकांची पाण्याची गरज भागविण्यासाठी हा महत्वपूर्ण प्रकल्प आहे. बंधारा प्रकल्प बांधण्यासाठी राज्यात इतर कुठेच लोक विरोध करीत नाहीत. कारण त्यांना या प्रकल्पामागील महत्व माहिती आहे. सभेत सोनारबाग रहिवाशांनी व्यक्त केलेली मते आम्ही खात्यातर्फे सरकारला कळविणार आहोत, असेही मुख्य अभियंते प्रमोद बदामी म्हणाले.