लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : कर्नाटकात काँग्रेसचे सरकार सत्तेवर येत असल्याने म्हादईप्रश्नी गोवा भाजपला आता कंठ फुटला आहे. पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या काल झालेल्या बैठकीत म्हादईच्या पाण्यावरील गोव्याचे कायदेशीर हक्क आणि हित जपण्यासाठी व कायदेशीर लढाईसाठी राज्य सरकारला पक्षातर्फे पूर्ण पाठिंबा जाहीर करणारा महत्त्वाचा ठराव संमत करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष सदानंदशेट तानावडे, आरोग्यमंत्री विश्वजित राणे व इतर मंत्री, आमदार बैठकीला उपस्थित होते. म्हादईवरील पाटबंधारे प्रकल्पांना कर्नाटकने डीपीआर मंजूर करून घेऊन पाणीही वळवले तरी आतापर्यंत गोवा भाजपने मिळमिळीत भूमिका घेतली होती. परंतु, आता कर्नाटकात भाजपची सत्ता गेल्यावर म्हादईच्या बाबतीत ठराव संमत केला.
म्हादई नदी ही गोव्याची जीवनरेखा आहे. गोव्यात म्हादईच्या प्रवाह क्षेत्रात लागवडीखालील भातशेती, खाजन जमिनी, कालवे, बांधारे, खाड्या यांचा समावेश आहे. म्हादईचे हित जपण्यासाठी राज्य सरकार जी काही पावले उचलेल त्याला पक्षाचा सदैव पाठिंबा राहील, असे ठरावात म्हटले आहे.
जी-२० बैठका घेण्यासाठी गोव्याची निवड केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा ठराव घेण्यात आला. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये ओबीसी, एससी, एसटींना मिळून एकूण ४१ टक्के आरक्षण बहाल करून दीर्घकालीन मागणी पूर्ण केल्याबद्दल सावंत सरकारचे अभिनंदन करण्यात आले. फोंडा व साखळी पालिका निवडणुकांमधील यशामुळे मुख्यमंत्री सावंत व कृषिमंत्री रवी नाईक यांचे अभिनंदन केले.
खाणी सुरु करण्यावर भर
खाण व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलल्याबद्दल मुख्यमंत्री सावंत व त्यांच्या सरकारचे अभिनंदन करणारा ठराव घेण्यात आला. खाण ब्लॉक्ससाठी यशस्वी लिलाव झालेला आहे आणि खाण व्यवसाय आता लवकरच सुरु होणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. खाण अवलंबितांना रोजगार सुनिश्चित करण्यासाठी हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल असल्याचे नमूद करण्यात आले आहे.