पणजी : कर्नाटकमध्ये भाजपा सत्तेवर आला तर म्हादई नदीचे पाणी कर्नाटकला देण्याची ग्वाहीच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जाहीरपणे मंगळवारी दिल्यानंतर शहा यांच्याविरुद्ध गोव्यात विविध पक्षांकडून आणि पर्यावरणप्रेमी संस्थांकडून जोरदार टीका सुरू झाली आहे. शहा यांनी म्हादईप्रश्नी गोव्याला आणि मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाही विकले, अशी टीका माजी राज्यसभा खासदार तथा काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी बुधवारी येथे केली.गोवा सुरक्षा मंचानेही शहा यांच्या विधानांवर टीका केली आहे. गोवा म्हादई बचाव अभियानाचे सचिव राजेंद्र केरकर यांनीही शहा यांच्या विधानाला तीव्र आक्षेप घेतला आहे. म्हादई नदीचे पाणी आम्ही कर्नाटकला देणारच नाही, असे गोवा भाजपा व गोव्याचे जलसंसाधन मंत्री तथा गोवा फॉरवर्डचे नेते विनोद पालयेकर हे वारंवार सांगत आहेत आणि दुस-याबाजूने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा हे मात्र कर्नाटकला पाणी देण्याचे आश्वासन देत आहेत, याबाबत गोव्यात संताप व्यक्त होऊ लागला आहे. सगळ्य़ाच विषयांचे राजकारण करणारा भाजपा म्हादई पाणीप्रश्नीही राजकारण करत असल्याची कल्पना गोमंतकीयांना दीड-दोन महिन्यांपूर्वीच आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री पर्रीकर यांना शहा यांनी दिल्लीत बोलावून घेऊन येडीयुरप्पा यांना पत्र देण्यास सांगितले व मुख्यमंत्र्यांनी चोवीस तासांत पत्रही दिले होते. म्हादई नदीच्या पाणीप्रश्नी कर्नाटकशी चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत व पाणी वाटपाची चर्चा करणो तत्त्वत: मान्य असल्याचे विधान पर्रीकर यांनी करून गोव्यात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर जलसंसाधन मंत्री पालयेकर यांनी मात्र हा राजकीय स्टंट असल्याची टीका करत एकही थेंब पाणी कर्नाटकला देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. म्हादईचे पाणी कर्नाटकला देऊ नये म्हणून गोवा राज्याने कोटय़वधी रुपये खचरून एवढा काळ पाणी तंटा लवादासमोर लढाई लढलेली आहे याची कल्पना तरी शहा यांना आहे काय असा प्रश्न गोव्यातील पर्यावरणप्रेमींकडून सध्या विचारला जात आहे. शहा यांनी कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकला नवे गाजर दाखविल्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाईक यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना टीका केली. शहा यांनी गोव्याला विकलेच. गोव्यातील भाजपला व पर्रीकर यांच्यासाठीही शहा यांनी अवघड स्थिती निर्माण करून टाकली आहे. गोवा भाजपने याविषयी स्पष्टीकरण द्यावे, असे नाईक म्हणाले.
सुरक्षा मंचचीही टीकाम्हादई पाणीप्रश्नी सुरक्षा यात्र काढलेल्या गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांनी शहा यांच्या पदाला पक्षपातीपणा शोभत नाही असे म्हटले आहे. म्हादई नदीचे पाणी मलप्रभेत वळविणे हे सर्वस्वी बेकायदा व अनैसर्गिक आहे. कर्नाटकचा खोटेपणा लवादासमोरही स्पष्ट झालेला आहे. मात्र कर्नाटकच्या अधाशी मागणीला खतपाणी घालण्याचे काम शहा करत आहेत, असे शिरोडकर यांनी म्हटले आहे. गोव्यातील भाजप कार्यकत्र्यानी शहा यांना सावध करावे, असे शिरोडकर यांनी म्हटले आहे.