लोकमत न्यूज नेटवर्क, वाळपई: सत्तरीत भाजपा सरकारने लावलेल्या १४४ कलमाचा निषेध 'सेव्ह म्हादई सेव्ह सत्तरी फ्रंट'तर्फे करण्यात आला. शनिवारी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार टीका केली.
संयोजक हनुमंत परब म्हणाले की, सरकारने लोकशाहीचा खून केला असून जनता जर शांततेत म्हादई विषयी जागृती करत असेल तर ती बंद करून जनतेच्या स्वातंत्र्याचा अधिकार हिसकावून घेत आहे. त्यासाठी सरकारने ताबडतोब १४४ कलम मागे घ्यावे. रणजित राणे यांनी सांगितले की, १४४ कलम लावण्यात स्थानिक आमदार त्यांच्या मार्गदर्शनाने हे कलम लावले आहे. त्यामुळे सरकार मंत्र्यापुढे नमते घेते का? असा प्रश्न उपस्थित केला. सत्तरीला आंदोलनाचा इतिहास आहे जर सरकार जनतेचा अधिकार हिसकावून घेत असेल तर त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील, असेही राणे यांनी सांगितले.
अॅड. गणपत गांवकर यांनी सांगितले की, सरकारने कोणत्या कारणामुळे १४४ कलम लावले आहे हे स्पष्ट करावे. जी कारणे लावली आहे ती अस्पष्ट कारणे दिली आहे. म्हादई आमची आई मानतो; पण त्या म्हादईबद्दल जर कोणी जागृती करीत असेल तर स्थानिक मंत्र्याने हरकत घेण्याचे कारण नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"