पणजी : म्हादई पाणीप्रश्न गोवा व कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मिळून चर्चेद्वारे सोडवावा, असे मत कर्नाटकमधील महत्त्वाचे नेते असलेले केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोमवारी पणजीत व्यक्त केले.
कर्नाटक व गोव्यातून वाहणा-या म्हादई नदीविषयी दोन्ही राज्यांमध्ये अनेक वर्षे वाद सुरू आहे. म्हादई पाणी तंटा लवादाने याविषयी अलिकडेच निवाडा दिलेला आहे. याविषयी जोशी यांना पत्रकारांनी विचारले असता, ते म्हणाले की लवादाच्या निवाडय़ाविषयी दोन्ही राज्ये समाधानी नाहीत. दोन्ही राज्यांना निवाडा मान्य झालेला नाही. यामुळेच दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून पाणीप्रश्न सोडवायला हवा. मी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना व्यक्तीश: तशी विनंती करीन.
लवादाच्या निवाडय़ाचा कर्नाटक सरकार भंग करत असल्याविषयी विचारले असता, जोशी म्हणाले, की लवादाच्या निवाडय़ाचा कुणालाच भंग करता येत नाही. कुणालाच तसा अधिकारही नाही. कर्नाटकने म्हादईच्या कालव्यांचे काम सुरू ठेवलेले नाही.केंद्र सरकारने गोव्यातील सात नद्यांना राष्ट्रीय जलमार्गाचा दर्जा दिला आहे असेही जोशी यांनी एका प्रश्नादाखल नमूद केले. कर्नाटकमध्ये कधीही गोमांस बंदी आली तरी, गोव्यावर त्याचा काही परिणाम होईल असे आपल्याला वाटत नाही असेही ते म्हणाले.
चर्चेचा प्रश्न आता कुठे ?माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी येथे काँग्रेस हाऊसमध्ये बोलताना पत्रकारांपाशी म्हादईप्रश्नी आपली प्रतिक्रिया दिली. जेव्हा लवादाने निवाडा दिलेला आहे, तेव्हा चर्चेद्वारे वाद सोडविण्याचा प्रश्नच येत नाही. लवाद नियुक्त होण्यापूर्वी चर्चा व्हायला हवी होती. एकदा लवाद नियुक्त केला व लवादाने निवाडाही दिल्यानंतर आता चर्चा करावी या विधानाचा अर्थ काय झाला ते मला कळत नाही, असे कामत म्हणाले.