पणजी : राज्यातील म्हादई पाणीप्रश्नी केंद्राने गोव्याची फसवणूक केली अशा प्रकारचे विधान राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले होते, असा संदर्भ गोवा फॉरवर्ड पक्षाने शनिवारी दिला व येत्या विधानसभा अधिवेशनात आपण याविषयी स्थगन प्रस्ताव आणणार असल्याचे जाहीर केले.
म्हादई पाणीप्रश्नी चर्चा व्हायला हवी. कुणी कुणी गोव्याची फसवणूक केली ते स्पष्ट व्हायला हवे व त्यासाठी स्थगन प्रस्ताव आणू, असे फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई म्हणाले. येत्या 7 रोजी विधानसभेचे अधिवेशन आहे. चाळीस सदस्यीय विधानसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस देण्यासाठी सात आमदार असावे लागतात. आमच्याकडे तीनच आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेस व मगोपच्या आमदाराने तसेच अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनीही आमच्या प्रस्तावाला पाठींबा द्यावा अशी मागणी सरदेसाई यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्नाटकच्या भेटीवर असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी पंतप्रधानांकडे पन्नास हजार कोटींची मागणी केली. कारण कर्नाटकला त्या निधीतून जलसिंचनाचे सगळे प्रकल्प उभे करायचे आहेत. कर्नाटकला पाणी हवे असल्याचे येडीयुरप्पा म्हणतात. म्हादईचे गोव्यात येणारे सगळेच पाणी वळविण्याची कर्नाटकची योजना आहे व ती योजना यशस्वी होईल हे दिसत आहे. कारण गोवा सरकार निष्क्रीय आहे व केंद्र गोव्याची फसवणूक करत आहे, असे सरदेसाई म्हणाले. म्हादई, खाण बंदी व अन्य प्रश्नांपेक्षा गोव्यातील भाजपला नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा विषय महत्त्वाचा वाटला व त्या पक्षाने हजारो लोकांना रस्त्यावर आणले, असेही ते म्हणाले.
रोड शो बंद कराविदेशात पर्यटनाच्या नावाखाली होणारे रोड शो बंद करा अशी मागणी सरदेसाई यांनी केली. रोड शो म्हणजे पर्यटन मंत्री आणि त्यांच्या कुटूंबांसाठी सहलीचा विषय असतो. त्याद्वारै पैसा वाया घालविला जातो. इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टीव्हल आयोजित करण्यास हरकत नाही पण ते गोवा सरकारच्या मनोरंजन संस्थेने आयोजित करावेत. त्यात ड्रग्जचा वापर होऊ नये. सध्या गोव्याच्या पर्यटनाची वाट ही गोवा सरकारनेच लावली आहे, असेही सरदेसाई म्हणाले.