लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : म्हादईसाठी जे काही गरजेचे आहे ते आपण करीत आहे. म्हादई ही आपली आई असून कुठल्याही स्थितीत ती वळवू देणार नसल्याची हमी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
पणजी येथे आयोजित गोवा स्टार महिला पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो व इतर मान्यवर उपस्थित होते. विविध क्षेत्रांत भरारी घेणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी बॉलीवूडच्या प्रसिद्ध गायिका हेमा सरदेसाई यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांना तुम्ही म्हादईसाठी काय करणार? असा प्रश्न केला.
त्यावर मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले. म्हादई ही आपली आई आहे. मुख्यमंत्री झाल्यापासून आम्ही म्हादई वाचवण्यासाठी सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ही न्यायालयीन लढाई आहे. म्हादईसाठी लवाद स्थापन केला, तसेच अनेक ठोस पावले उचलली. म्हादईच्या लढ्याला आमच्या सरकारचा पाठिंबा हा कायम राहणार आहे. त्यामुळे लोकांनी निश्चिंत राहावे. म्हादईसाठी जे काही शक्य ते सरकार करीत असून कुठल्याही स्थितीत ती वळवू देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.