पणजी : म्हादई नदी केवळ गोव्यातूनच वाहत नाही तर ती कर्नाटक आणि महाराष्ट्रातून देखील वाहते. त्यामुळे म्हादई नदीच्या पाण्याचे गोवा व कर्नाटक यांच्यात वाटप होणो हे अपरिहार्य व अटळ आहे. लवादाच्या निवाडय़ात देखील तसेच अपेक्षित असू शकते. जर कुणाला पाणी वाटप शक्यच नाही असे वाटत असेल तर संबंधित व्यक्ती वेडय़ांच्या नंदनवनात वावरत आहेत असे म्हणावे लागेल असे सांगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बुधवारी म्हादईप्रश्नी आपली भूमिका अधिक स्पष्ट केली.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांनी मुख्यमंत्री र्पीकर यांना म्हादई पाणीप्रश्नी विचारले तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, की मी कर्नाटकला म्हादईप्रश्नी पत्र देताना गोव्याच्या हिताचा विचार केला आहे. माङो पत्र हे अतिशय योग्य आहे. काहीजण त्या पत्रमधील मजकुराच्या बाहेर जातात व विविध अर्थ लावतात. म्हादई नदीचा 35 किलोमीटरचा प्रवाह हा कर्नाटकमधून वाहतो. सोळा किलोमीटर महाराष्ट्रातून जातो आणि 52 किलोमीटर गोव्याहून जातो. ज्या जागेतून नदी जात असते, त्या जागेतील व्यक्तींना पाणी मिळणार नाही असे म्हणता येत नाही पण नदीचे पाणी दुस:या नदीमध्ये वळविता येणार नाही. कारण म्हादई नदीत पाणी कमी आहे. हाच विषय लवादासमोर आहे. म्हादई नदीचे पाणी वळवावे की नाही असा मुद्दा लवादासमोर असून आम्ही पाणी वळविण्यास विरोध केला, कारण म्हादईत पुरेसे पाणी नाही आणि 75 टक्के गोवा या पाण्यावर अवलंबून आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, की नदीतील पाण्याचे वाटप हे होणारच आहे. ते अपरिहार्य आहे. ज्याला कायदा समजतो, त्याला तरी ते निश्चितच कळून येईल. लवादाच्या निवाडय़ात देखील म्हादईचे पाणी वाटप करावे असा निष्कर्ष असू शकतो. गोव्यातील ज्या 21 संस्था व संघटना म्हादईप्रश्नी सध्या संघटीत होऊन लढू पाहत आहेत, त्यातील बहुतेकजण हे नेहमीचेच कलाकार आहेत. त्यांनी आपल्याला म्हादईप्रश्नी एकही पत्र लिहिलेले नाही. त्यांनी लोकांसमोर जावेच. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पत्र मला मिळाले आहे व आपण ते पत्र जलसंसाधन खात्याकडे पाठवून दिले आहे. कारण सिद्धरामय्या हे तीन राज्यांमध्ये बैठक कधी घेऊया असे पत्रद्वारे विचारतात व ते म्हादईचे पाणी वळविण्याची भाषा पत्रत करतात.
कर्नाटकचे भाजप नेते येडीयुरप्पा याना पत्र लिहिण्यापूर्वी आपण निर्मला सावंत व राजेंद्र केरकर यांच्याशी बोललो होतो, असेही मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नादाखल सांगितले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांचे वय झाल्याने त्यांना स्मृतीभ्रंश झाला आहे अशा प्रकारची टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
वास्कोत जेटीचा विस्तार
दरम्यान, मुरगाव बंदरात जर धक्क्याचा विस्तार करण्याचे काम होत असेल तर त्याला आमचा आक्षेप नाही. कारण धक्क्याचा वापर हा पोलाद किंवा अन्य कोणत्याही वस्तूच्या वाहतुकीसाठी करता येतो. कोळसा हाताळणीचा विस्तार करण्यास आमचा विरोध आहे. जेटीच्या विस्ताराला आक्षेप घेण्याचे कारण नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
.........