म्हापसा - विद्यमान मंडळाची स्थापना झाल्यापासून संगीत खुर्चीचा खेळ सुरु असलेल्या म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्षपदी डॉ. नुतन बिचोलकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
मंडळाच्या आज शुक्रवारी उपजिल्हाधिकारी तसेच निर्वाचन अधिकारी उदय प्रभूदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मंडळाच्या झालेल्या विशेष बैठकीत त्यांची निवड करण्यात आली . निवडीनंतर डॉ.बिचोलकर यांनी आपल्या पदाचा ताबा स्विकारला. महिलांसाठी आरक्षीत असलेल्या या पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता.
पालिकेच्या निवडणुकीनंतर सर्वात प्रथम शुभांगी वायंगणकर तर त्यांच्यानंतर प्रिया मिशाळ या नगराध्यक्ष बनल्या होत्या. मिशाळ यांनी ८ फेब्रुवारीला आपल्या पदाचा राजीनामा सादर केला होता. त्यानंतर हे पद रिक्त झाले होते. शहर आणि शहराचा विकास हा विषयाची हाताळणी प्रामुख्याने आपल्या अजेंडावर असणार असल्याचे बिचोलकर ताबा स्विकारल्यानंतर म्हणाल्या. कुठलेही कार्य हाती घेताना त्यात समस्या प्रश्न असतील पण त्यावर सकारात्मक दृष्ट्या मार्ग काढून पुढे जाणार आहे.
यावेळी डॉ. बिचोलकर यांनी मतदारांनी समाजकार्य करण्यासाठी आपल्याला निवडून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच सर्व नगरसेवक, उपसभापती जोशुआ डिसोझा तसेच भाजपने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल ही त्यांचे आभार मानले. एक संघ म्हणून पुढील वाटचाल करणार असल्याची माहिती बिचोलकर यांनी दिली. बुधवारी उपनगराध्यक्ष विराज फडके यांनीही आपल्या पदाचा राजीनामा सादर केला होता. लवकरच यापादासाठी निवड होणार आहे.