पणजी : गोव्यात मध्यरात्री मोठ्या नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीत फूट पडली आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीच्या दोन आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. आमदार मनोहर आजगावकर आणि दीपक पावस्कर यांनी गोवा विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो यांच्याकडे पत्र दिलं आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचं भाजपात विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे एकून तीन आमदार आहेत. यात आम्ही दोन तृतीयांश सदस्य असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. मनोहर आजगावकर आणि दीपक पावस्कर यांनी मंगळवारी रात्री पावणे दोनच्या सुमारास गोवा विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो यांच्याकडे पक्ष भाजपात विलीन करत असल्याचं पत्र सादर केले. मात्र महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे तिसरे आमदार सुदीन ढवळीकर यांनी या पत्रावर सही केलेली नाही आहे. सुदीन ढवळीकर भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. पक्षांतर बंदी कायद्यानुसार दोन तृतीयांश पेक्षा जास्त सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे आमदार भाजपात आल्याने गोव्यातील भाजपा सरकार आता स्थिर झालं आहे. गोवा विधानसभेत 36 सदस्यांपैकी आता भाजपाचे 14 सदस्य आहेत.
सुदीन ढवळीकरांची खुर्ची धोक्यातमुख्यमंत्री प्रमोद सावंत सरकारमध्ये आपल्याला मंत्री पद दिले जाणार असल्याचा दावा दीपक पावस्कर यांनी केला आहे. तर सुदीन ढवळीकर यांची कॅबिनेटमधून उचलबांगडी होण्याची शक्यता मुख्यमंत्री कार्यालयातील एक वरिष्ठ अधिकाऱ्यानं वर्तवली आहे. गोवा सरकारमध्ये सुदीन ढवळीकर सध्या उपमुख्यमंत्री पदावर काम करत आहेत.