वास्को - वास्को शहरातील स्वतंत्रपथ मार्गावर असलेल्या रोहन आरकेड इमारतीच्या पहील्या व दुसऱ्या मजल्यावरील तीन कार्यालयात अज्ञात चोरट्यांनी 3 लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी कार्यालयात घुसून 3 लाख 57 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. रात्रीच्या वेळी इमारतीत कोणीच नसल्याची संधी अज्ञात चोरट्यांनी साधून दोन कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचं टाळं तोडलं. तर एका कार्यालयाच्या शौचालयाच्या खिडकीच्या लोखंडी सळ्या कापून आत प्रवेश केला आणि कार्यालयात ठेवलेली रोख रक्कम घेऊन घटनास्थळावरून पोबारा काढला.
वास्को पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक सर्वेश सावंत यांनी दिलेल्या माहीतीनुसार, शुक्रवारी (21 सप्टेंबर) सकाळी 8.30 च्या सुमारास सदर चोरीचा प्रकार उघडकीस आला. गुरूवारी रात्री 8 च्या सुमारास रोहन आरकेड इमारतीत असलेली विविध व्यवस्थापनाची कार्यालये बंद झाली होती. शुक्रवारी सकाळी इमारतीतील कार्यालये उघडण्यासाठी कर्मचारी आले असता इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या ‘नासेक कन्सलटन्सी’ व ‘मरीनलींक शिपींग एजंन्सी’ कार्यालयाच्या मुख्य दरवाजांचे टाळे अज्ञातांनी फोडल्याचे दिसून येताच याबाबत त्वरित वास्को पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन चौकशी करण्यास सुरू केली. दोन कार्यालयाबरोबरच पहिल्या मजल्यावर असलेल्या ‘एस.जी हेगडे टॅक्स कन्सलटन्ट’ कार्यालयातही अज्ञात चोरट्यांनी शौचालयाच्या खिडकीचे ग्रील कापून आत प्रवेश करून येथेही चोरी केल्याचे उघड झाले.
अज्ञात चोरट्यांनी हेगडे याच्या कार्यालयात असलेल्या कपाटातील 50 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली असून मरीनलिंक मधून 2 लाख 32 हजार तर नासेक कन्सलटन्सी कार्यालयातून 74 हजार 900 रुपयांची रोख रक्कम लंपास केली असल्याची माहीती पोलिसांनी दिली. पोलीसांनी शुक्रवारी दुपारी सदर चोरी प्रकरणात तपास करण्यासाठी ठसे तज्ञ तसेच श्वान पथकाच्या मदतीने पंचनामा केली असून ही चोरी करण्यासाठी एकापेक्षा जास्त चोरट्यांचा समावेश असावा असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
चोरी झालेल्या एका कार्यालयात सी.सी.टीव्ही कॅमेरा होते, मात्र कार्यालय बंद करून जात असताना ते बंद केल्याने चोरट्यांना त्वरित गजाआड करण्याची असलेली एक संधी पोलिसांनी गमावलेली आहे. वास्कोतील ज्या इमारतीतील तीन कार्यालयात या चोऱ्या झाल्या आहेत ती इमारत वास्को पोलीस स्थानकापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर असून सदर चोरी प्रकरणामुळे वास्कोतील नागरीकात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.