पणजी : राज्यातील लोह खनिजाच्या खाणी येत्या २0 जानेवारीपर्यंत सुरु न झाल्यास २१ जानेवारी रोजी गोवा बंद करू, असा इशारा खाण अवलंबितांनी दिला असून काँग्रेसनेही या बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे सोळाही आमदार रस्त्यावर उतरतील, असे जाहीर करण्यात आले. खाण अवलंबितांनी आज दिवसभर येथील आझाद मैदानावर लाक्षणिक उपोषण केले.संसदेच्या येत्या अधिवेशनात पहिले तीन दिवस गोव्यातील खाण अवलंबित दिल्ली येथे जंतरमंतरवर धरणे धरणार आहेत. गोव्याचे काँग्रेसी आमदार या आंदोलनातही सहभागी होतील. खाणबंदीमुळे ज्यांना झळ पोचली आहे त्या सर्वांच्या पाठीशी काँग्रेस असल्याचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी यावेळी जाहीर केले. सुमारे ५00 खाण अवलंबितांनी सकाळपासून आझाद मैदानावर लाक्षणिण उपोषण केले. सत्ताधारी भाजपचे आमदार, मंत्री तसेच काँग्रेसचे आमदार, खासदार नरेंद्र सावईकर आणि केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनीही अवलंबितांची भेट घेऊन पाठिंबा दिला.सर्वात जास्त मी भोगले : दिगंबर कामतआमदार दिगंबर कामत म्हणाले की, खाणबंदीमुळे मोठे आर्थिक संकट गोव्यावर ओढवले असून लोक बेरोजगार झाले आहेत. त्यांना न्याय न मिळाल्यास प्रसंगी आमदारकीचे राजीनामा देण्याची आमची तयारी आहे. सर्वच व्यवसायात बेकायदेशीपणाची काळी बाजू असते. मासळी विक्रीतही बेकायदेशीरपणा चालतो म्हणून काही संपूर्ण व्यवसायच बंद करावा अशातला भाग नाही. खाणी पूर्ववत सुरु व्हायलाच हव्यात. कामत पुढे म्हणाले की, गोव्यात खाणी पोर्तुगीज काळापासून सुरु आहेत. केंद्राचा एमएमडीआर कायदा १९५७ साली आला. त्याआधी १९0६ पासून पोर्तुगीज काळात कन्सेशन्स पध्दतीवर खाणी चालू आहेत.कथित खाण घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल झालेले कामत म्हणाले की, खाणीच्या प्रकरणात सर्वात जास्त मी भोगले. खाण अवलंबितांची बाजू घेऊन बोलतो म्हणून कोणी कितीही मला त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी पर्वा नाही. अवलंबितांबरोबर कुठेही आंदोलनात उतरण्याची आमची तयारी आहे. जंतरमंतरवरही आम्ही येऊ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांनी खाणबंदीमुळे राज्याचे अर्थकारण कोडमडले आहे, असा आरोप केला. किमान ४0 ते ५0 हजार लोक बेकार झाले आहेत. बाजारपेठा ओस पडल्या आहेत. खाणी पूर्ववत सुरु करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यायला हवे, असे ते म्हणाले. अवलंबितांचे नेते पुती गांवकर यांनी यावेळी असे जाहीर केले की, संसद अधिवेशनाच्या काळात दिल्लीत जंतर मंतरवर पहिले तीन दिवस धरणे धरणार त्यात काँग्रेसी आमदारांनीही सहभागी होण्याचे आश्वासन दिलेले आहे.अशी आहे पार्श्वभूमीगोव्यातील खाणी सध्या बंद आहेत. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या ७ फेब्रुवारी रोजी ८८ खाण लिजांचे नूतनीकरण रद्द ठरविले त्यामुळे १६ मार्चपासून खाणी पूर्णत: बंद आहेत. खाणी पूर्ववत सुरू व्हाव्यात ही मागणी घेऊन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे. काँग्रेसी आमदारांसह सर्वपक्षीय शिष्टमंडळानेही यापूर्वी केंद्रीय खाणमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. परंतु खाणी सुरू करण्याच्या बाबतीत कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असल्याने वटहुकूम काढून खाणी पूर्ववत सुरू करता येतील, असे अवलंबितांचे म्हणणे आहे.
खाण प्रश्नी २१ जानेवारी रोजी गोवा बंद, काँग्रेसी आमदारांचाही पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 6:58 PM