पणजी : खनिज घोटाळा प्रकरणाच्या तपासात एसआयटीकडून बराच जोर धरला असून लुटीची रक्कम गोठवण्याची कारवाईही एसआयटीकडून करण्यात आली आहे. परंतु गोठविण्यात आलेले ६० कोटी रुपये जप्त करण्याच्या बाबतीतच एसआयटीची खरी कसोटी आहे. त्यावरच या प्रकरणातील तपासाचे यश व अपयश अवलंबून आहे.
बेकायदेशीरपणे खनिजाची ट्रेडिंग करणारा इम्रान खान याच्या बँकेतील एकूण १०० कोटी रुपयांच्या कायम ठेवी गोठवण्याची सूचना एसआयटीकडून बँकांना करण्यात आल्यानंतर आतापर्यंत दोन टप्प्यात मिळून ६० कोटी रुपये गोठविण्यात आले आहेत. हे ६० कोटी रुपये केवळ गोठविण्यात आले आहेत जप्त करण्यात आलेले नाहीत. म्हणजेच इम्रान खान हे पैसे केवळ काढू शकत नाही, तसेच त्या बाबतीत कोणताही व्यवहार करू शकत नाही. परंतु अद्याप या पैशांचा मालकी हक्क त्याच्याकडेच आहेत. केवळ तपासात अडकल्यामुळे त्याच्या कामी पैसा तूर्त येवू शकत नाही. परंतु ही स्थिती केवळ तात्पुरती आहे. जप्त करण्यात आलेले पैसे हे बेकायदेशीर खनिज उद्योगातूनच मिळविण्यात आले आणि राज्याच्या तिजोरीला फटका देऊन उभारण्यात आले हे सिद्ध झाल्याशिवाय हे पैसे जप्त करणे एसआयटीला शक्य होणार नाही. त्यामुळे एसआयटीचे खरे काम आताच सुरू होत आहे.
एसआयटीचे निरीक्षक दत्तगुरू सावंत यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणातील तपासाने वेग निश्चित घेतला आहे. खाण मालकांना आणि नावे गुप्त ठेवलेल्या मोठ्या ट्रेडरनाही समन्स जाऊ लागले आहेत. कोट्यवधी रुपयांची लूट करणा-या आणि मोठ्या राजकारण्यांशी संबंध ठेऊन हा घोटाळा केला अशा ट्रेडरनाही अटक करण्याचे धाडस दाखविण्यात आले. इतके सारे असले तरी न्यायालयाचा निवाडा हा पुरावे आणि साक्षींवर अवलंबून असतो.
परिस्थितीजन्य पुरावे उभे करण्यासही मर्यादा या असतात. कागदोपत्री पुरावे हे लुटणा-या माणसापेक्षा किती लूट झाली याची माहिती अधिक देत आहेत. मोठा साक्षीदार म्हणून खाण खात्याचे माजी संचालक जे बी भिंगी हे एक मोठे नाव एसआयटीच्याबाजूने सध्या आहे. तेवढ्यावर काही भागणार नाही याची जाणीवही एसआयटीला आहे. ज्यांना सशयित म्हणून एसआयटीकडून समन्स पाठविण्यात आले ते काही साक्षीदार म्हणून एसआयटीला सहकार्य करणार नाहीत. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावणे हे एसआयटीसाठी मोठे आव्हान आहे. त्यापूर्वी या प्रकरणात आरोपपत्र ठेवणे हे ही एक तितक्याच महत्त्वाचे काम ठरणार आहे.