पणजी: आंदोलनाच्या नावावर धुडगूस घातलेले खाण आंदोलक पोलिसांचे समन्स मिळाल्यावर पोलीस स्थानकात येण्याचे धाडस कुणीच करीत नाही. समन्स मिळाल्यावर सर्वात अगोदर अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली जात आहे. त्यामुळे आंदोलकांनी पोलिसांचा किती धसका घेतला आहे हे स्पष्ट होत आहे.१९ मार्चचा मोर्चाच्या वेळी दादागिरी करून लोकांना मारहाण करण्याच्या प्रकरणानंतर पोलिसांनी केलेला लाठीमार आणि दुसऱ्या दिवसापासून सुरू केलेला समन्सचा मार यामुळे आंदोलकांना कोणती भानगड करून बसलो असेच झाले आहे. पणजी पोलिसांनी आतापर्यंत ७० हून अधिक जणांना समन्स पाठविले आहेत, परंतु कुणीही समन्स पाठविल्या नंतर पोलीस स्थानकात येण्यासाठी हिंमत दाखवित नाही. पूर्वी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करतात व नंतर पोलीस स्थानकात येतात असे प्रकार सध्या सुरू आहे. आतापर्यंत २० हून अधिक लोकांनी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केले आहेत. तसेच नवीन २२ जणांना शनिवारी समन्स बजावण्यात आले होते. ते लोकही अटकपूर्व जामीन मिळविण्यसाठी तयारी करीत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. सोमवारी ते अर्ज सादर करण्याची शक्यता आहे.दरम्यान अटकपूर्व अर्जासाठी अर्ज केल्यानंतर अंतरीम जामीन मिळणार या अपेक्षेने अर्ज केले जात आहेत. अंतरिम दिलासा मिळाला नाही तर अशा आंदोलकांना पोलीस अटक करण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. कारण समन्स बजावूनही हजर न राहिलेल्या आंदोलकांना ताब्यात घेऊन पणजीत आणा अशा सूचना करणारे वायरलेस कळंगूट व संबंधित पोलीस स्थानकांना पणजी पोलिसांनी पाठविले होते. त्यामुळे अशा लोकांची अटकही होण्याची शक्यता आहे.
खाण आंदोलकांनी घेतला पोलिसांचा धसका, समन्स मिळताच जामिनासाठी धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 11:12 PM