पणजी : खनिज खाणी सुरू व्हायला हव्यात असेच आम्हाला वाटते. मात्र या खाणी फक्त खनिज विकास महामंडळामार्फत सुरू केल्या जाव्यात, असे मत ज्येष्ठ पर्यावरणवादी व गोवा फाऊंडेशनचे संचालक डॉ. क्लॉड अल्वारीस यांनी व्यक्त केले आहे. अल्वारीस हे यापूर्वी बेकायदा खाण धंद्यांविरुद्ध विविध न्यायालयांत अनेक खटले जिंकलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयातही यापूर्वी ते जिंकले. 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत अल्वारीस म्हणाले, की वास्तविक 2018 सालीच खनिज खाणी सुरू झाल्या असत्या पण भाजपा सरकारने फक्त पूर्वीचे लुटारू खाण कंपन्यांचे भवितव्य जपण्यासाठी विलंब केला व त्यामुळे अजून खाणी सुरू होऊ शकल्या नाहीत.
ज्या खाण कंपन्यांनी गोव्याला संकटात टाकले व पर्यावरण उद्ध्वस्त केले, त्यांच्याच भवितव्याचा विचार भाजपा सरकारने केल्याने खाणी सुरू झाल्या नाहीत. मात्र त्या नव्या वर्षी खनिज विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरू केल्या जाव्यात असे आम्हाला वाटते. जेवढे लवकर सरकार खनिज विकास महामंडळामार्फत खाणी सुरू करू पाहिल, तेवढ्या लवकर खाणी सुरू होतील.
अल्वारीस म्हणाले, की आपण आता वयाची सत्तरी गाठली आहे. त्यामुळे आता नव्यावर्षी गोवा फाऊंडेशन या लढाऊ संस्थेसाठी नवे संचालक लाभो असा माझा प्रयत्न आहे, मी नवे संचालक मिळवून देईन, जेणेकरून मी लेखनासाठी माझा वेळ देऊ शकेन. राज्यातील निश्चित अशा काही पर्यावरणीय विषयांबाबत लोकांमध्ये जागृती घडविण्यासाठी मी व्हिडीओद्वारे शॉर्ट टॉक्स देण्याचाही विचार करत आहे. माङो तसे नियोजन सुरू आहे. लोकांना पर्यावरणाच्या विषयांबाबत माहिती हवी आहे. गोव्याचे पर्यावरण संकटात आहे पण आम्ही सकारात्मक आहोत. गोव्याला अजूनही वाचविता येते हाच सकारात्मक विचार आम्हाला पुढे घेऊन जात आहे. आम्ही सकारात्मक नसतो तर आमचा लढा कधीच थांबविला असता.