पणजी - खाणबंदीमुळे नाराज अवलंबित शुक्रवारी (20 सप्टेंबर) गोव्यात जीएसटी मंडळाच्या बैठकीच्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमून धडक देणार आहेत. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना आंदोलक निवेदन सादर करतील. गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचे अध्यक्ष पुती गांवकर यांनी ही माहिती दिली.
जुने गोवे महामार्गावरील एका तारांकित हॉटेलमध्ये जीएसटी मंडळाची बैठक होत असून अनेक केंद्रीय तसेच राज्य सरकारचे मंत्री उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय वित्तमंत्र्यांना निवेदन देऊन खाणबंदीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम तसेच नोकऱ्या गेल्याने ओढवलेली बेकारी व खनिजवाहू ट्रक, बार्जेस आदी व्यावसायिकांवरील संकट याची माहिती देऊ, असे गांवकर यांनी सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 88 खाणींचे लीज रद्द केल्यानंतर गेली दोन वर्षे राज्यातील खाण व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. केंद्र सरकारने मध्यस्थी करुन या प्रकरणी तोडगा काढावा, अशी अवलंबितांची मागणी आहे. केंद्र सरकारकडे अवलंबितांनी या मागणीचा पाठपुरवा केला असता मध्यंतरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्रिगटाची बैठक घेऊन राज्यातील खाण उद्योग पूर्ववत कसा सुरू करता येईल याची चाचपणी केली होती.
केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी मंत्रिगटाने तयार केलेला अहवाल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सादर केला जाईल, अशी माहिती अलीकडेच ते गोवा दौऱ्यावर आले असता दिली. दरम्यान, एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अनुचित प्रकार टाळण्यासाठी कदंब पठारावरील ज्या तारांकित हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे. तेथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवला जाई, असे सांगितले. बैठकस्थळापासून बऱ्याच अंतरावर खाण अवलंबित आंदोलकांना अडविले जाईल.