पणजी - गोव्यातील खाण लिजांच्या बेकायदेशीर नूतनीकरण प्रकरणात प्रदेश कॉंग्रेसने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात पोलीस मुख्यालयात तक्रार केली आहे. पक्षाचे अध्यक्ष गिरीश चोडणकर आणि विरोधीपक्षनेते बाबू कवळेकर यांनी इतर नेत्यांसह गुरूवारी पणजी पोलीस मुख्यालयात जाऊन पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांची भेट घेतली. तसेच त्यांना सरकारकडून करण्यात आलेल्या खाण लिजांच्या बेकायदेशीर नूतनीकरण प्रकरणात माहिती दिली. तसेच तक्रारही सादर केली. सर्वोच्च न्यायालयाने सर्व खाण लिजे रद्द केली असताना आणि नवीन नूतनीकरणासाठी वेगळे निकष ठरविले असताना हे सर्व कायदे नियम धाब्यावर बसवून खाण लिजे बहाल करण्यात आल्याची तक्रार त्यांनी केली आहे. यात आजी आणि माजी मुख्यमंत्र्यांबरोबरच खाण खात्याचे संचाक प्रसन्न आचार्य, खाण सचिव पवन कुमार सेन आणि मुख्यमंत्री पर्रीकर यांचे सचीव कृष्णमूर्ती यांची नावेही संशयिताच्या यादीत घालण्यात आली आहेत.
खाण व खनिजे कायद्यात दुरुस्ती सुचविलेल्या असताना आणि खाणलिजांचा लिलाव करून वितरण करण्याचा प्रस्ताव असताना घाईघाईने लिजांचे नूतनीकरण करण्याच्या बेकायदेशीर कृत्यात खाण खात्याचे संचालक आचार्य यांच्यासह खाण सचिव पवनकुमार सेन यांचाही समावेश आहे. मुख्यमंत्री पर्रीकर व माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांचा त्यात हात आहे. त्यांनी आपल्या पदांचा गैरवापर करून लिजांचे नूतनीकरण केले. हे नूतनीकरण नंतर सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविले ही गोष्ट वगळी, परंतु या बेकायदेशीर प्रक्रियेमुळे सरकारी तिजोरीला मोठे नूकसान झाल्याचे कॉंग्रेसने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.