मडगाव - २0१४ च्या कथित खाण घोटाळा प्रकरणी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे आज सोमवारी सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर राहिले. न्यायालयाने त्यांच्याकडून वैयक्तीक वीस हजार रुपयांचे हमीपत्र घेतले. या खटल्याची पुढील सुनावणी २७ एप्रिलला होणार आहे.मागच्या सुनावणीच्या वेळी मडगावचे आमदार कामत हे गैरहजर राहिल्याने दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीक्ष सायनोरा लाड यांनी त्यांच्याविरोधात नव्याने समन्स जारी केले होते. डॉ. प्रफुल्ल हेदे व अँथनी डिसोझा हे अन्य संशयित आहेत. काल सुनावणीच्या वेळी हेदे हे हजर नव्हते. न्यायालयाकडून त्यांनी हजर न राहण्यासंबधी सूट मिळविली होती. कामत यांच्यावतीने वकील प्रवित्रन यांनी बाजू मांडली.डॉ. हेदे यांच्या कुळे येथील खाण सुरु करण्यासाठी बेकायदेशीररित्या ‘कंडोनेशन आॅफ डिले’ची सवलत देऊन बेकायदेशीररित्या लीज परवान्याचे नुतनीकरण केल्याचा भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याच्या एसआयटीने कामत व अन्य दोघांवर आरोपपत्र दाखल केले आहे.२७ फेब्रुवारीला या प्रकरणाची मागणी सुनावणी झाली होती. यावेळी डॉ. प्रफुल्ल हेदे यांच्यावतीने अॅड. योगेश नाडकर्णी तर अँथनी डिसोझा यांच्यावतीने अॅड. एस. भांगी न्यायालयात उपस्थित होते. कामत हे त्यावेळी अमेरिकेत असल्याने ते न्यायालयात उपस्थित राहू शकले नव्हते.कामत यांच्यासह हेदे व डिसोझा यांच्याविरुध्द खाण कायदयाखाली कारस्थान रचणे, फसवणुक करणे व भ्रष्टाचाराच्या कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. मागच्या सुनावणीच्या वेळी एसआयटीच्यावतीने सरकारी अभियोक्ता तसेच स्वत एसआयटीचा तपास अधिकारीही हजर नव्हता. न्यायालयाने पुढील सुनावणीच्या वेळी तपास अधिकाऱ्याला हजर राहण्याचा आदेश जारी केला होता.गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी)ने दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयात संशयितांविरुध्द आरोपपत्र दाखल केले आहे. १५७२ पानाचे हे आरोपपत्र असून, त्यात ४0 साक्षिदारांच्या जबान्या जोडलेल्या आहेत.
खाण घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत न्यायालयात हजर, पुढील सुनावणी २७ एप्रिलला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 7:48 PM