खाण घोटाळा ३५ हजार कोटींचा, पण ३५ रुपयेही वसुली नाही; कॅप्टन विरियातो यांची सरकारवर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2024 01:33 PM2024-04-24T13:33:37+5:302024-04-24T13:34:30+5:30
चर्चेचे दिले आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : राज्यातील खाण व्यवसायात ३५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोप भाजप नेत्यांनी करून खाण व्यवसाय बंद केला; पण गेल्या १२ वर्षांत ३५ रुपये वसुली करण्यात सरकारला जमलेले नाही. संजीवनी साखर कारखाना बंद करून जागा हडप करण्याचा प्रयत्न सरकारातील नेत्यांनी केला आहे. इतर देशांतून काजू आयात केली जात असल्याने काजू बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत, असे उद्गार दक्षिण गोव्याचे इंडिया आघाडीचे काँग्रेस उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी काढले.
सावर्डे मतदारसंघातील खाणी तसेच संजीवनी साखर कारखाना बंद करून इथल्या सामान्य जनतेवर अन्याय झाला आहे. त्यामुळे खाण अवलंबित व संजीवनी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक व कामगारांची स्थिती बिकट बनली आहे. २०१४ साली लोकसभा निवडणुकीपूर्वी खाणी सुरू करण्याचे पंतप्रधान मोदी यांनी दिलेले आश्वासन गेल्या १० वर्षांत पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे डबल इंजिन सरकारची गॅरंटी यावेळी गोव्यातील जनता फोल ठरविणार असल्याचे कॅप्टन फर्नाडिस यांनी सांगितले. फर्नांडिस यांनी इतर कार्यकर्त्यांसह सावर्डे मतदारसंघाचा दौरा केला.
यावेळी तारा केरकर, सावर्डे काँग्रेस गट समितीचे अध्यक्ष जयेश पाटील, गौतम (श्याम) भंडारी, संकेत भंडारी, त्रिबेलो सौझा व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर संजीवनी साखर कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही कॅप्टन फर्नाडिस यांनी दिली.