लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: 'पंचायत चलो अभियान' अंतर्गत आज, २७ पासून १ मार्चपर्यंत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व अन्य मंत्री पंचायती व पालिका क्षेत्रांनाही भेट देणार आहेत. ठरवून दिलेल्या मतदारसंघांमध्ये मंत्री संपूर्ण दिवस घालवतील. पंचायती व पालिकांना भेट देऊन लोकांशी संवाद साधतील.
मुख्यमंत्री दोन मतदारसंघ फिरणार आहेत, तर मंत्री विश्वजीत राणे, रोहन खंवटे, गोविंद गावडे यांना प्रत्येकी ४ मतदारसंघ देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत पणजी आणि ताळगाव मतदारसंघात महापालिका व पंचायतींना भेटी देतील. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे मुरगाव, नुवे, शिरोडा व मडकई मतदारसंघातील पंचायती व पालिकांना, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो कळंगुट, काणकोण, पेडणे व सांत आंद्रे मतदारसंघातील पंचायतींना, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर सांताक्रुझ, हळदोणे व सावर्डे मतदारसंघातील पंचायतींना भेट देतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या 'विकसित भारत २०४७' संकल्पनेच्या आधारेच सावंत सरकारने विकसित गोव्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आर्थिक वृद्धीबरोबरच सर्वागीण विकासाचे ध्येय सावंत सरकारने ठेवले आहे. त्यानुसार, केंद्र, तसेच राज्य सरकारच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
पर्यटनमंत्री रोहन खंवटे कुडचडे, दाबोळी, प्रियोळ व वेळ्ळी मतदारसंघांमधील पंचायतींना, कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे सांगे, साळगाव, कुडतरी व कुंकळ्ळी मतदारसंघांमधील पंचयातीना, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात वास्को, मडगाव व मये मतदारसंघातील पंचायतींना भेट देतील. वीजमंत्री सुदिन ढवळीकर हे म्हापसा, साखळी व कुठ्ठाळी मतदारसंघांमधील पंचायतींना, मच्छीमारी खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर हे फातोर्डा, फोंडा व कुंभारजुवे मतदारसंघांमधील पंचायतींना, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई हे पर्ये, मांदे, पर्वरी व थिवी मतदारसंघातील पंचायतींना तर पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्चेरा हे नावेली, बाणावली, केपे व शिवोली मतदारसंघांमधील पंचायतींना भेट देणार आहेत.
कार्यकर्त्यांच्या घरी चहा-नाश्ता व जेवण
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच विविध उपक्रमांचा सपाटा लावला आहे. मुख्यमंत्र्यांसह मंत्री ठरवून दिलेल्या मतदारसंघ दौऱ्याच्या वेळी तेथील प्रमुख कार्यकर्त्याच्या घरीच सकाळचा नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण मंत्री घेणार आहेत.