'कोळसा वाहतूक अन् मजूर पुरविण्याची कंत्राटे घेतल्यानेच मंत्री मिलिंद नाईकांची चुप्पी'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 09:42 PM2019-02-13T21:42:31+5:302019-02-13T21:43:16+5:30
महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांचा आरोप
पणजी : मुरगांव बंदरातील कोळसा हाताळणी बंद करण्यास स्थानिक आमदार तथा नगरविकासमंत्री मिलिंद नाईक हे त्यांचे हितसंबंध गुंतल्यानेच उत्सुक नसल्याचा आरोप महिला काँग्रेसने केला आहे. कोळसा वाहतूक, मजूर पुरविण्याची कंत्राटे मंत्री नाईक यांच्याकडे आहेत. म्हणूनच ते या प्रश्नावर काही करू इच्छित नाहीत, असा आरोप करण्यात आला.
पत्रकार परिषदेत प्रदेश काँग्रेसच्या महिला आघाडी अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी मंत्री मिलिंद नाईक यांची मयुरेश्वर ट्रान्स्पोर्ट कंपनी असून त्याव्दारे बर्थ क्रमांक 7 अ वरुन अदानी कंपनीच्या आणि बर्थ क्रमांक 5 अ आणि 6 अ वरुन जिंदाल कंपनीच्या कोळशाची वाहतूक ते करतात. डेल्टा कंपनीत ते संचालक आहेत. झुवारी अॅग्रो कारखान्याला धमकी देऊन कंत्राट मिळविले तसेच मजूर पुरविण्याची कंत्राटेही ते घेतात, अशा आरोप कुतिन्हो यांनी केला. अदानी आणि जिंदाल या दोन्ही कंपन्यांनी प्रमाणापेक्षा जास्त कोळसा हाताळणी चालवली आहे त्यामुळे वास्को शहरातच नव्हे तर सडा, रुमडावाडा, जेटी, बायणा, खारीवाडा आदी आजुबाजुच्या परिसरातही कोळशाचे प्रचंड प्रदूषण होत आहे. स्थानिकांना श्वसनाचा त्रास जाणवत आहे. लहान मुले, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात झळ पोचली आहे.
कुतिन्हो पुढे म्हणाल्या की, ‘काँग्रेसचे सरकार सत्तेवर होते तेव्हा मुरगांव बंदरात बर्थ क्रमांक 10 आणि 11 वरुन कोळशा हाताळणी चालू होती. परंतु मुरगांव बचाव अभियानने आवाज उठविल्यानंतर सरकारने त्वरित कोळसा हाताळणी बंद केली.’ कोळसा हाताळणी बंद केल्यास 500 कामगार उपाशी पडतील या मंत्री नाईक यांच्या दाव्यात काहीच अर्थ नाही. या ठिकाणी असलेले कामगार झारखंड, ओडिशा आदी भागातील परप्रांतीय आहेत, असे ते म्हणाले. वेस्टर्न इंडिया शिपयार्ड बंद पडले तेव्हा 350 कामगारांचा उदरनिर्वाह गेला त्यावेळी नाईक यांना काही वाटले नाही का?, असा सवाल कुतिन्हो यांनी केला.
‘एक जागा महिलांना मिळावी’
लोकसभेसाठी महिला काँग्रेस उमेदवारीसाठी दावा करणार काय या प्रश्नावर कुतिन्हो म्हणाल्या की, ‘दोनपैकी किमान एक जागा तरी महिला उमेदवाराला मिळायला हवी. महिलांना प्रतिनिधीत्त्व दिले तर निश्चितच त्याचे स्वागत करु.’ दरम्यान, ‘महिला काँग्रेस एनजीओ बनल्यासारखी वागत आहे, अशी जी टिका आवदा व्हिएगश यांनी केली होती त्याचा समाचार घेतला. त्या म्हणाल्या की, ‘ मदत मागण्यासाठी पीडीत युवतीचे पालक माझ्याकडे आले होते. मी त्यांच्याकडे गेले नव्हते.