पणजी: २०४७ पर्यंत भारत देश हा स्वावलंबी व विकसित बनवण्यात योगदान देऊ अशी शपथ शहर विकासमंत्री विश्वजीत राणे यांनी विकसित भारत संकल्प यात्रेवेळी घेतली.
मिरामार येथे विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ झाला. यावेळी पालिका प्रशासन खात्याचे संचालक गुरुदास पिळर्णकर, पणजी मनपाचे अधिकारी वर्ग व अन्य उपस्थित होते. यावेळी मंत्री राणे यांनी उपस्थितांना सरकारच्या विविध योजनांच्या पत्रकांचे वाटप केले.तसेच केंद्राच्या योजनांचे उपस्थितांना डिजीटल सादरीकरण दाखवले.
मंत्री राणे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश विकासाची नवनवीन उंची गाठत आहेत. पंतप्रधानांच्या सक्षम मार्गदर्शनखाली नागरिकांसाठी विशेष करुन पंचायत पातळीवर विविध योजना राबवल्या जात आहेत.यात आरोग्य क्षेत्र, कृषी क्षेत्र तसेच एकूणच सामान्य जनतेसाठी योजनांचा समावेश आहे. या योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या बरीच मोठी आहे. मात्र अजूनही या योजनांची जागृती व्हायला हवी. त्याअनुषंगाने विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून ही जागृती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.