लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : डीपीआरला मंजुरी मिळाली म्हणजे कळसा, भंडुरा प्रकल्पाचे काम करण्यास रान मोकळे मिळाले ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची समजूत हे निव्वळ अज्ञान आहे, असे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले. प्रकल्पाचे काम पुढे नेण्यासाठी मुख्य वन्यप्राणी मंडळ, पर्यावरण खाते आदींची परवानगी लागेल, असे त्यानी सांगितले.
शिरोडकर म्हणाले की, 'म्हादईच्या बाबतीत गोव्याला केंद्राकडून न्याय मिळेल याबाबत शंका नाही. डीपीआरला मंजुरी दिल्यानंतर केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना मी भोपाळला भेटलो. त्यांनी गोव्यावर अन्याय होणार नाही, असे सांगितले आहे त्यामुळे म्हादईला नक्कीचसंरक्षण मिळेल याचा मला ठाम विश्वास आहे. शिरोडकर म्हणाले की, 'म्हादईचा विषय २००२ पासून जवळपास २१ वर्षे हा प्रश्न रेंगाळत पडला आहे. डीपीआरला मंजुरी म्हणजे कर्नाटकने सर्वकाही मिळवले असे नाही.'
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बेळगाव येथे जाहीर सभेत गोव्याशी सल्लामसलत करुनच म्हादईचे पाणी वळविण्याचा निर्णय झाल्याचे जे विधान केले त्याबद्दल आपल्याला भाष्य करायचे नाही, असे शिरोडकर म्हणाले. शहा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हादईबाबत गोव्याला सांभाळतील याबद्दल आम्हाला खात्री आहे' असे ते म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"