फोंडा: स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंमुळे ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे स्वप्न साकार झाले आहे. राज्याने देखील बऱ्यापैकी साधनसुविधा तयार झाले आहेत, असे प्रतिपादन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
फार्मगुडी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर सोमवारी तिरंदाजी शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ढवळीकर प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यात आणि आजूबाजूच्या राज्यातील खेळाडूंना खेळाच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात अशी माझी नेहमीच इच्छा राहिली आहे. यासाठी मी प्रयत्न देखील केले आहे. मी देखील एक खेळाडू आहे आणि मी जवळपास १३ वर्षे क्रिकेट खेळलो आहे. १०,००० हून अधिक खेळाडू, अधिकारी आणि क्रीडा संघटनांचे सदस्य गोव्यात आले आहेत. या खेळाडूंमुळे खेळांचे आयोजन करण्याचे स्वप्न साकार झाले आहे, असे ढवळीकर यांनी यावेळी सांगितले.
मी सर्व खेळाडू आणि असोसिएशन सदस्यांचे अभिनंदन करतो, विशेषत: इतर राज्यांतील खेळाडू व पदाधिकारी जे राज्यात स्पर्धेच्या निमित्ताने दाखल झाले आहे. तसेच खेळाडूंनी खेळासोबत सर्व खेळाडूंनी गोव्याच्या सौंदर्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहनही ढवळीकर यांनी यावेळी केले.