पणजी - राज्यात उद्या रविवारपासून वीज दरात बरीच वाढ होत असल्यामुळे पर्रिकर सरकारमधील काही मंत्रीही खूप नाराज झालेले आहेत. खाण बंदी लागू झालेली असताना व खाणींवर आधारीत राज्यातील अनेक लहानमोठे उद्योग धंदे अडचणीतून जात असताना आता राज्यात मोठी वीज दरवाढ लागू झाल्याने काही सत्ताधारी आमदार व विरोधी पक्षाचे आमदारही तीव्र नापसंती व्यक्त करू लागले आहेत. वीज दरवाढ मागे घेण्याची मागणी वीज खात्याने संयुक्त वीज नियमन आयोगाकडे करावी लागेल, असे मत काही मंत्री व्यक्त करत आहेत.
लोकांना अगोदरच वीज बिले परवडत नाहीत. छोटय़ा दुकानदारांना दुकानातून आईस्क्रिम विकणोही परवडत नाही. फ्रिज कायम चालू ठेवावा लागतो व प्रचंड बिल येते अशी खंत दुकानदार व्यक्त करतात. शेतक-यांनाही वीज बिलापोटी खूप पैसे खर्च करावे लागतात. अशा स्थितीत येत्या रविवारपासून म्हणजे दि. 1 एप्रिलपासून वीज दरात वाढ होत असल्याने लोकांच्या मनात वीज खात्याच्या कारभाराविषयीही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. आम्ही वीज दरात आणखी वाढ होऊ देणार नाही, असे सरकारने गेल्या सहा महिन्यांत तीनवेळा जाहीर केले आहे. मग संयुक्त वीज नियमन आयोग आता वीज दरवाढ करत असताना सरकारचे संबंधित अधिकारी नेमके काय करत आहेत असा प्रश्न काही सत्ताधारी आमदारांना व विरोधी आमदारांनाही पडला आहे.
माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी यापूर्वी अनेक वर्षे वीज खाते सांभाळले आहे. त्यांनी ट¦ीटरद्वारे प्रथमच वीज दरवाढीविरुद्ध आता तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. घरगुती वापराच्या वीजेसाठी लोकांना सरासरी 11.48 टक्के जास्त पैसे वीज बिलावर खर्च करावे लागतील असा समज लोकांमध्ये पसरला आहे. कृषी वापरासाठीच्या वीजेवर 9.38 टक्के जास्त खर्च शेतक:यांना करावा लागेल. उद्योगांसाठीच्या वीजेसाठी वाढीव 5.81 टक्के तर व्यवसायिक कारणास्तव वापरल्या जाणा:या वीजेसाठी येणा:या बिलावर साधारणत: 3.80 टक्के जास्त पैसे ग्राहकांना मोजावे लागतील. यामुळे आतापासूनच लोकांमध्ये चीड व्यक्त होऊ लागली आहे. दिगंबर कामत यांनी तर ही वीज दरवाढ धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर ही वीज दरवाढ परिणाम करेल, असे त्यांनी नमूद केले आहे. सरकारचे काही मंत्रीही नाराजी व्यक्त करू लागले आहेत. काही मंत्र्यांनी भाजपच्या कोअर टीमच्या सदस्यांशी संपर्क साधून वीज दरवाढीच्या नव्या निर्णयाबाबत नापसंती व्यक्त केली.
दरम्यान, एलईडी वीज दिवे राज्यभर विविध खांबांवर लावण्यात आले आहे. हे वीज दिवे संबंधित कंत्रटदार यंत्रणा आता काढत असल्याने काही मंत्र्यांनी वीज अभियंत्यांशी संपर्क साधून हस्तक्षेपाची मागणी केली आहे. चुकीच्या जागी वीज दिवे लावले गेले व त्यामुळे आम्ही ते काढत आहोत, असे कंत्रटदार यंत्रणोकडून सांगितले जाते. मात्र चुकीच्या ठिकाणी लावले तरी, आता ते एलईडी वीज दिवे लाढण्यास लोकांचा आक्षेप आहे. त्यामुळे दिवे काढू नका, अशी मागणी आमदार करत आहेत.