पणजी - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे दिल्लीतील एम्स रुग्णालयातून काही दिवसांपूर्वी परतल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्या घरीच राहिलेले आहेत. ते दोनापावल येथील त्यांच्या निवासस्थानातून काम करत असल्याचे काहीवेळा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात असले. तरी, प्रत्यक्षात आपण भेट मागितली तरी, आपल्याला ती मिळत नाही असा अनुभव काही मंत्री व आमदारांना येत आहे.
पर्रीकर यांना काही मंत्री तसेच काही आमदार भेटू पाहतात पण त्यांच्या निवासस्थानी त्यांना कुणीच भेटू शकत नाहीत. दिल्लीला अमित शहा यांना भेटायला जाण्यापूर्वी कृषी मंत्री विजय सरदेसाई व सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर हे दोघेच स्वतंत्रपणे काही मिनिटांसाठी भेटले होते. सभापती प्रमोद सावंत हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असून तेही दिल्लीला गेले होते पण दिल्लीला निघण्यापूर्वी ते पर्रीकर यांना भेटले नव्हते.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर हे गेल्या आठवड्यात पर्रीकर यांना भेटले होते. पण अन्य कुणाला भेट मिळालेली नाही. पर्रीकर पर्वरी येथील सचिवालयात तथा मंत्रालयात पोहचलेले नाहीत. चतुर्थीपूर्वीच ते काही दिवस मंत्रालयात गेले होते. मंत्रिमंडळाच्या बैठका तर होतच नाहीत. सर्व मंत्र्यांनी आपण दर बुधवारी अनौपचारिकपणे सचिवालयात भेटायचे असे ठरवले होते. पण केवळ एकाच बुधवारी सगळे मंत्री एकत्र आले, मग कधीच एकत्र आले नाहीत. काही मंत्री तर कामे जलदगतीने होत नसल्याने वैतागले आहेत. अर्थ, गृह अशी सगळी महत्त्वाची खाती अन्य मंत्र्यांमध्ये वितरित करून मुख्यमंत्र्यांनी केवळ नावापुरते मुख्यमंत्रीपदी रहावे असे मत खासगीत व्यक्त करू लागले आहेत. मुख्यमंत्र्यांकडे अर्थ, गृह, उद्योग, वन, पर्यावरण, शिक्षण, उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण आदी अनेक खाती आहेत.