गोवा राज्यात गुन्हेगारी चहूबाजूंनी वाढतेय. गेल्या महिन्यात गणेशपुरी म्हापशात अहमद देवडी नावाच्या तरुणास एका टोळक्याने बेदम मारहाण केली, त्यात त्याचा मृत्यू झाला. तीन दिवसांपूर्वी कोलवाळ परिसरात दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्याची घटना उघडकीस आली. राज्यात केवळ सामान्य माणूसच असुरक्षित आहे असे नाही तर मंत्रीदेखील भयभीत होऊ लागले आहेत. त्यांनाही थेट धमक्या दिल्या जात आहेत. मंत्रीही पोलिसांकडे न्याय मागू लागले आहेत.
थिवीचे आमदार व राज्याचे मच्छीमार मंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्या बाबतीत घडलेली घटना साधीसुधी नव्हे त्या घटनेला आणखीही पैलू असू शकतात. आपल्याला एका बिल्डरने धमकी दिल्याचे हळर्णकर यांनी बुधवारी जाहीर केले. हा विषय गोव्याबाहेरही चर्चेत आहे, कारण हळर्णकर यांनी धमकी देणारा माणूस पीएमओ कार्यालयाचादेखील उल्लेख करतो असे म्हटले आहे. आपल्या ओएसडीला बक्षी नावाच्या बिल्डरने फोन केला व त्याची स्वतःची पीएमओ आणि राष्ट्रपती कार्यालयाशीही लिंक आहे अशा इशारेवजा भाषेत तो बोलला, असे हळर्णकर यांनी स्पष्ट केले आहे. एका मंत्र्याला अशा प्रकारे जाहीर वाच्यता करून बिल्डरविरुद्ध कारवाईची मागणी करावी लागते. पूर्ण गृहखात्याने विचार करावा असा हा विषय आहे.
मंत्री, आमदारांना धमक्या येतात व नंतर हल्लेही होतात; अशा गोष्टी बिहार, उत्तर प्रदेश व दिल्लीत वगैरे घडल्याचे ऐकले होते. मात्र ही प्रकरणे गोव्यातही घडू लागलीत. चार वर्षांपूर्वी जानेवारी २०२० मध्ये त्यावेळचे बांधकाममंत्री दीपक प्रभू पाऊसकर यांनादेखील काहीजणांनी धमकी दिली होती. धमकी देऊन तीन कोटींची खंडणी पाऊसकरांकडून वसूल करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल महाराष्ट्रातील तिघांना गोवापोलिसांनी अटक केली होती. काही विषयांना दुसरी बाजू असते; पण ती उघड व्हायला थोडा उशीर लागतो.
नीळकंठ हळर्णकर यांना धमकी देणाऱ्याचा शोध कोलवाळ पोलिस घेत होते. हळर्णकर यांच्या वतीने पोलिसांत तक्रार गेल्यानंतर गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी त्याला गुरुवारी सकाळी अटक केली. सामान्य माणसाला कुणी धमकी दिली तर पोलिस लवकर गुन्हादेखील नोंद करत नाहीत, असे अन्य काही पोलिस स्थानकांच्या क्षेत्रात घडतेय, लोकांना पोलिसांविषयी खूप अनुभव आहेत. कन्हैय्या कुमार खून प्रकरण फोंडा व मडगाव परिसरात सध्या गाजत आहेच. त्या प्रकरणी तिघा पोलिसांचे निलंबनही झाले आहे. नीळकंठ हळर्णकर हे सौम्य व नम्र प्रकृतीचे राजकीय नेते. हळर्णकर यांची गाडी रेवोडा येथे होती, तिथे समोरच दुसरे वाहन पार्क केले होते, हळर्णकर यांना आपली गाडी काढता येईना. दुसऱ्या वाहनाचा मालक गौरव बक्षी हा बिल्डर, सामाजिक कार्यकर्ता व फिल्म कलाकारही आहे.
गाडी हटविण्याची विनंती मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाने केली. या विषयावरून वाद झाला व बक्षीने आपल्यासह सुरक्षा रक्षकालाही धमकी दिली, असे हळर्णकर यांचे म्हणणे आहे. वास्तविक एखादा छोटा बिल्डर मंत्र्याला धमकी देण्याचे धाडस गोव्यात तरी करत नाही. तरीदेखील धमकी दिली हा मंत्र्यांचा दावा आहे. शिवाय आपले राष्ट्रपती व पंतप्रधान कार्यालयापर्यंत संबंध आहेत, असे बिल्डरने मंत्र्याला बजावणे हेही अतीच झाले. तक्रार आल्यानंतर कोलवाळ पोलिसांनी बक्षी यास लगेच बुधवारी अटक का केली नाही हा प्रश्न येतोच. बक्षी याने मंत्री हळर्णकर यांची तक्रार खोटी असल्याचे म्हटले आहे. आपण चांगले काम करतो, हे काही राजकारण्यांना आवडत नाही, त्यामुळे अगदी क्षुल्लक विषयाचा बाऊ करून धमकीचे खोटे रुप दिले जात आहे, असे बक्षी म्हणतो. खरे म्हणजे या प्रकरणी सखोल चौकशी व्हायला हवी, असे आम्हाला वाटते.
दिल्ली, हरयाणा, मुंबई, बंगळुरू, पुणे येथील बिल्डरांनी अर्धा गोवा ताब्यात घेतलेलाच आहे. गोव्यातील काही मोठे राजकारणीही रियल इस्टेट व्यावसायिक झाले आहेत. अर्थात नीळकंठ हळर्णकर यांचा विषय वेगळा आहे. त्याचा रियल इस्टेट व्यवसायाशी काही संबंध नसेलही. मात्र विविध भागांत सध्या भाटकार, जमीनदार, बिल्डर यांचीच दादागिरी चालते. सरकारचे प्रशासनावर नियंत्रण नाही व पोलिसांचाही कोणत्याच स्थितीवर कंट्रोल राहिलेला नाही. त्यामुळे मंत्र्यांनादेखील असुरक्षित वाटू लागलेय ही गोंयकारांची शोकांतिका आहे. सत्य कळण्यासाठी धमकी प्रकरणाच्या मुळाशी मात्र जावे लागेल.