लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: म्हापसा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तोडफोडीवरुन उसळलेल्या वादाच्या प्रकरणावर नियंत्रण आणून ते बंद करण्यास योग्य कारवाई करण्याचे विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. त्यानंतरही सरकारमधील मंत्र्यांनी स्वतः प्रत्यक्ष स्थळावर जाऊन विधान करणे चुकीचे असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. भाजप कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळेकर उपस्थित होते.
मणिपूर येथील लोकांना भाजप सरकार पूर्णपणे सहकार्य करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची पुष्टीही केली आहे. लोकसभेत विरोधकांना मणिपूर विषयावर चर्चा करण्यासाठी वेळ देण्याची तयारी अध्यक्षांनी दाखविली होती. परंतु विरोधकांना राजकारण करायचे होते म्हणून त्यांनी अविश्वास ठराव सादर करून त्यामध्ये मणिपूर विषयावर चर्चा केली.
लोकसभा राज्यसभेच्या अधिवेशात विरोधकांनी फक्त मुख्य उद्देशापासून दूर पळण्याचा प्रयत्न केला. दिल्लीचे विधेयकासाठी विरोधकांनी अनेक प्रयत्न केले होते. पण तरीही लोकसभा आणि राज्यसभेच्या दिल्लीचा विधेयकावर बहुमताने भाजपने जिंकले आहे, असेही तानावडे यावेळी बोलताना म्हणाले.
भाजपने देशात मोठी विकास केला आहे. काँग्रेस जातीयवादावर मते मागत आहे. पण भाजप आपल्या विकासकामावर मते मागत आहे. लोकसभेच्या निवडणुका तोंडावर विरोधक एकत्र येतात. पण त्यांना देशाच्या जनतेचे काहीच पडलेले नसते. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देश विकासाच्या प्रगतीपथावर आहे, असेही तानावडे म्हणाले.
केंद्र सरकारच्या ज्या योजना राज्यासाठी आहे. त्या देण्याचा प्रयत्न करणार आहे. राज्यसभा खासदाराला खास केंद्र सरकारच्या योजना राज्यासाठी असतात. या योजना मार्फत गोव्यात विकास कामे केली जाणार आहे, असेही तानावडे यांनीसांगितले.