लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी घेतलेल्या चिंतन शिबिरात मंत्र्यांनी विकासकामांना निधी द्या, जवळजवळ सात वर्षे बंद असलेली 'गृह आधार' योजना मार्गी लावा, असा रेटा लावला. वित्त खात्याकडून फाइल्स लवकर निकाली काढल्या जात नाहीत व त्यामुळे प्रकल्प रखडतात, असा तक्रारीचा सूर काही मंत्र्यांनी लावला.
दक्षिण गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुरुवारपासून दोन दिवसीय चिंतन शिबिर सुरू झाले. वीजमंत्री सुदिन ढवळीकर वगळता सर्व मंत्री तसेच आयएएस व आयपीएस अधिकारी उपस्थित होते. ढवळीकर हे राज्याबाहेर असल्याने येऊ शकले नाहीत. आज, शनिवारी ते या शिबिरात भाग घेतील.
वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो हे काहीसे आक्रमकपणे बोलले. ते म्हणाले की, आम्ही विकासाच्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे वित्त खात्याकडून पुरेसा निधी जलद गतीने मिळायला हवा. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यानी गेली सात वर्षे गृहिणींसाठी असलेल्या ‘गृह आधार' योजनेचे अर्ज मंजूर झालेले नाहीत, याकडे लक्ष वेधले. सुमारे १४ हजार अर्ज पडून आहेत. ही योजना लवकरात लवकर मार्गी लावावी, अशी मागणी त्यांनी केली.
सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी वित्त खात्यात 'इज ऑफ डुइंग बिझनेसची गरज असल्याचे प्रतिपादन केले. ते म्हणाले की, खात्याकडून झटपट फाइल्स निकाली काढण्यासाठी सुटसुटीतपणा हवा. आरोग्यमंत्री विश्वजित राणे शिबिरात स्वतःच्या खात्याचे सादरीकरण करून मुंबईला निघून गेले. महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात व इतर मंत्री उपस्थित होते. त्यांनीही काही विषय मांडले. 'व्हिजन २०४७' नजरेसमोर ठेवून चिंतन शिबिराचे आयोजन केले आहे.
केंद्राचा सल्ला, अॅक्टिव्ह व्हा
- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या खात्यांच्या कामांना गती द्या. वेळोवेळी कामांचा आढावा घ्या, असे निर्देश केंद्र सरकारकडून भाजपशासित राज्यांना आले आहेत. त्या अनुषंगानेच हे चिंतन शिबिर घेण्यात आले.
- पायाभूत विकास, मनुष्यबळ विकास, एकूणच राज्याच्या हिताचे काही मुद्दे काल चर्चेला आले. आज, शनिवारी दुसया दिवशीही 'चिंतन' चालू राहणार असून, मुख्यमंत्र्यांकडून काही महत्त्वाचे निर्देश अपेक्षित आहेत.
- मंत्री विश्वजित राणे शिबिरात स्वतःच सादरीकरण करून मुंबईला निघून गेले. बाबूश मोन्सेरात व इतर मंत्री बैठकीला उपस्थित होते. त्यांनीही काही विषय मांडले. 'व्हिजन २०४७' नजरेसमोर ठेवून या चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
- भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हेही २ शिबिराच्या सुरुवातीला उपस्थित होते. नंतर ते पक्षाच्या संपर्क अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी निघून गेले. मंत्री ढवळीकर हे आज, शनिवारी या शिबिरात आपले काही महत्त्वाचे विषय मांडतील.
- आम्ही विकासाच्या गोष्टी करतो. मात्र, ही विकासकामे मार्गी लागण्यासाठी निधी गरजेचा असून, वित्त खात्याकडून पुरेसा निधी जलद गतीने मिळायला हवा, असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले.
- गृहिणींसाठी असलेल्या गृह आधार योजनेचे अर्ज मंजूर झालेले नाहीत. १४ हजार अर्ज पडून आहेत. ही योजना लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केली.
- वित्त खात्याकडून कामांच्या फाइल्स निकाली काढण्यासाठी सुटसुटीतपणा यायला हवा. फाइल्स वेळेत मार्गी लागल्या तर कामेही रखडणार नाहीत, असे बांधकाम मंत्री नीलेश काब्राल म्हणाले.