लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सावंत मंत्रिमंडळातून तूर्त तरी आणखी काही मंत्र्यांना वगळण्याची शक्यता भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी फेटाळून लावली.
'लोकमत'शी बोलताना सध्या तरी मंत्रिमंडळ फेररचना केली जाणार नाही, असे तानावडे यांनी सांगितले. चार राज्यांचे विधानसभा निवडणूक निकाल रविवारी जाहीर झाल्यानंतर गोव्यात मंत्रिमंडळाची फेररचना केली जाईल व जे आठ फुटीर आमदार भाजपात आहेत त्यापैकी किमान दोघांना मंत्रिपद दिले जाईल, अशी चर्चा होती.
मडगावचे आमदार दिगंबर कामत यांचे नाव यात आघाडीवर होते. भाजपचे केंद्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी आपल्यासोबत आणखी काही मंत्र्यांना राजीनामे तयार ठेवा, असे सांगितल्याचे विधान आमदार नीलेश काब्राल यांनी प्रसारमाध्यमांकडे केले होते. त्यावरून वेगवेगळे तर्क काढले जात होते; परंतु आता तानावडे यांनी तूर्त तरी मंत्रिमंडळ बदल नसल्याचे सांगून पूर्णविराम दिला आहे.
सक्षम नेतृत्वाचा विजय
राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने जे घवघवीत यश संपादन केले आहे, त्याबद्दल तानावडे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची दिल्लीत संसद भवनात भेंट घेऊन अभिनंदन केले. त्यानंतर द्वीट करताना तानावडे यांनी असे म्हटले आहे की, नड्डा यांचे सक्षम नेतृत्व आणि योगदान यामुळे हे यश पक्षाला मिळाले आहे.