ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 8- बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीला ५0 लाख रुपयांना विकण्याचा सौदा करण्यात मध्यस्थी केलेल्या रोझी फेर्रोस या महिलेला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. दुसरीकडे आमदार बाबूश मोन्सेरातच्या वैद्यकीय चाचण्या चालूच असून आज, सोमवारी त्याला कोठडी वाढवून घेण्यासाठी बाल न्यायालयात हजर केले जाणार आहे. बाबूशच्या मानसोपचार इस्पितळात रविवारीही चाचण्या झाल्या. शनिवारी सायंकाळी तसेच रविवारीही त्याला वेगवेगळ्या चाचण्यांसाठी या इस्पितळात नेल्याचे ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अशी माहिती मिळते की, बाबूशसाठी मुंबई किंवा दिल्लीहून आघाडीचे वकील आणण्याची तयारी त्यांच्या कुटुंबीयांनी चालविली आहे. सोमवारी त्याला बाल न्यायालयात हजर केले जाणार असून त्या वेळी त्याला पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकारी वकील करणार आहेत. गुन्ह्याच्यावेळी वापरलेली आणि नंतर रक्ताचे डाग पडलेली चादर या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. रक्ताचे नमुने तपासून जुळतात का पाहिले जाईल, असे सांगण्यात आले. पीडितेला आईच्या ताब्यात देऊ नका : आयोगगोवा राज्य बाल हक्क संवर्धन आयोगाने ‘अपना घर’च्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून कोणत्याही स्थितीत पीडित मुलीला तिच्या पालकांच्या किं वा केअरटेकरच्या ताब्यात देऊ नये, असे बजावले आहे. या मुलीच्या सुरक्षेसाठी दोन स्वतंत्र रक्षक नेमण्याची सूचना केली आहे. तसेच सुरक्षेविषयी काय उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती मागितली आहे. या पत्राची प्रत गुन्हा शाखेचे अधीक्षक कार्तिक कश्यप यांनाही पाठविली आहे. आयोगाच्या अध्यक्ष सुषमा कीर्तनी यांना पीडित मुलीची आई तिचा ताबा घ्यायला बघत असल्याची माहिती मिळाल्यावर त्वरित त्यांनी हे पत्र ‘अपना घर’च्या अधिकाऱ्यांना पाठवले. या गुन्ह्याला पीडितेच्या आईनेही प्रोत्साहन दिल्याचा आरोप असल्याने तिच्याकडे मुलीचा ताबा कसा देता येणार, असा सवाल आयोगाने केला. पोलिसांच्या मते, या प्रकरणात आई अटकेत असल्याने तिने ताबा मागण्याची शक्यताच नाही; परंतु मुलीच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलणे गरजेचे आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरण, मध्यस्थ महिलेला पोलीस कोठडी
By admin | Published: May 08, 2016 7:41 PM