पणजी : गोव्याच्या मिरामार किनाऱ्याचा सुमारे ४ कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दृष्टीने विकास केला जाणार असून त्यासाठी निविदा जारी करण्यात आल्या आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या सोसायटी ऑफ इंटेग्रेटेड कोस्टल मॅनेजमेंट या संस्थेने निविदा मागविल्या असून मिरामार किनाऱ्यावर प्रसाधनगृहे, पार्किंग सुविधा तसेच सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून टेहेळणी यंत्रणा आदी व्यवस्था केली जाणार आहे. ही संस्था इमॅजिन पणजी स्मार्ट सिटीच्या समन्वयाने हे काम करणार आहे.
किनाऱ्याचा आंतरराष्ट्रीय दर्जा काही निकष लावून ठरविला जातो. 'ब्ल्यू फ्लॅग' निकषात काही किनाऱ्यांचा समावेश होतो त्यात मिरामार किनाऱ्याला स्थान मिळाले आहे. इमॅजिन पणजी स्मार्ट सिटीचे संचालक माजी आमदार सिध्दार्थ कुंकळ्येंकर म्हणाले की, ‘ब्ल्यू फ्लॅग निकषात मिरामार किनाऱ्याची निवड होणे ही तशी भूषणावह बाब आहे. देशातील काही किनाऱ्यांचा यात समावेश झालेला आहे. या किनाऱ्याचा पर्यावरणाभिमुख विकास केला जाईल. पर्यटन व्यवसायाशी संबंधित घटक, स्थानिक मच्छिमार, स्थानिक रहिवाशी यांची समिती स्थापन केली जाईल. निविदा जारी करण्यात आल्याने आता एक दोन महिन्यात वर्क ऑर्डर काढून पावसाळ्यानंतर काम सुरु होईल.’
मिरामार किनारा राजधानीपासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटरवर असून येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. दरम्यान, रायबंदरची वीज समस्या त्या भागात स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत भूमिगत विद्युत वाहिन्या टाकून दूर केली जाईल. रायबंदरसाठी अन्य काही प्रकल्पही विचाराधीन आहेत, अशी माहिती कुंकळ्येंकर यांनी दिली. ते म्हणाले की, ‘हाती घ्यावयाच्या प्रकल्पांबाबत लोकांबरोबर योग्य सल्लामसलत केला जात आहे. असे पदपथ निर्माण करण्याची योजना आहे की ते विशेष गरजा असलेल्या व्यक्तींनाही सुलभपणे वापरता येतील. शहरवासियांना पुरेसे पिण्याचे पाणी, महिला, लहान मुले, वृध्द यांची सुरक्षा, कचरा समस्या निर्मूलन या गोष्टींवर भर देऊन शहर सुदृढ बनवायचे आहे.
कुंकळ्येंकर म्हणाले की, मळा संवर्धन प्रकल्पासाठी अंतर्गत रस्ते केले. मळा भागात घरे एकमेकांना खेटून आहेत तेथे विद्युत वाहिन्या व इतर गोष्टी भूमिगत करण्यात आल्या. अमृत योजने अंतर्गत पदपथ बांधले. आल्तिनोला जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या. कांपाल येथे नदी तटाचे सौंदर्यीकरण केले. पदपूल बांधल्याचे ते म्हणाले. रुअ द औरे खाडीवरील खारफुटींचे दर्शन घडविण्यासाठी लाकडी पूल बांधला. स्मार्ट सिटी म्हणजे केवळ काँक्रिटच्या इमारतीत स्थलांतर करणे नव्हे. पुरातन वारसा वास्तू जपणे हाही हेतू आहे, असे त्यांनी सांगितले.