पणजीः गोवा वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांच्या नातेवाईकांकडून वॉर्डच्या डॉक्टरशी गैरवर्तन करण्याचा आणि त्याला धमकी देण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणात दोघींवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गोमेकॉतील १४२ या पुरुषांच्या मेडिसीन विभागात २४ मे रोजी रात्री हा प्रकार घडला रुग्णाच्या उपचारासंबंधीच्या मुद्द्यावरून हा प्रकार घडला. डॉ सुदिन प्रभुदेसाई यांच्याशी एका रुग्णाच्या नातेवाईकांकडून गैरवर्तन केल्याचे आगशी पोलीस स्थानकात नोंदविण्यात आलेल्या तक्रारी म्हटले आहे. दोन नातेवाईकांविरुद्ध या प्रकरणात तक्रार नोंदविण्यात आली आहे. त्यांनी डॉक्टरशी बाचाबाची केली, वाईट शब्दात डॉक्टरची निर्भत्सना केली आणि त्यांना धमकी दिल्याचेही तक्रारी म्हटले आहे. शिवाय गोमेकॉच्या ऑन ड्यूटी अधिकाऱ्यांना ड्यूटी निभावताना अडवणूक केल्याचेही म्हटले आहे. या प्रकरणात आगशी पोलिसांनी म्हापसा येथील संशयित झिनिया फर्नांडीस आणि अन्य एका व्यक्तीवर गुन्हा नोंदविला आहे. भारतीय दंडसंहिता ५०४, ३५२, १८६ आणि ३५३ अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
आगशी पोलीस या प्रकरणात तपास करीत आहेत. दरम्यान डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांना मारहाण करणे आणि धमकी देणे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी गोवा सरकारने दहा वर्षांपूर्वी क्लिनिकल एस्टेब्लीशमेंट कायद्यात सुधारणा केली होती. मात्र त्या कायद्या अंतर्गत हे प्रकरण नोंदविण्यात आलेले नाही.