लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : अपात्रता याचिकेवर उत्तरादाखल प्रतिज्ञापत्र सादर करण्यास फुटीर आमदार दिगंबर कामत व मायकल लोबो यांनी विलंब लावल्याने ते रेकॉर्डवर घेण्यास अर्जदार अमित पाटकर यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला.
सभापती रमेश तवडकर यांच्यासमोर काल हे अपात्रता प्रकरण सुनावणीस आले. निर्धारित मुदतीत उत्तर सादर करणे अपेक्षित असताना दोन्ही आमदारानी विलंब लावला. त्यामुळे सभापती त्यांची प्रतिज्ञापत्रे दाखल करून घेऊ शकत नाहीत, असा मुद्दा पाटकर यांच्या वकिलांनी मांडला. सभापतींसमोर या मुद्यावर युक्तिवाद झाले. आपल्याला आठवडाभरात लेखी स्वरुपात युक्तिवाद सादर करा, असे निर्देश उभय पक्षकारांना दिले. तोपर्यंत या मुद्यावर निर्णय सभापतींनी राखून ठेवला आहे.
पाटकर यांनी ही अपात्रता याचिका दिगंबर कामत व मायकल लोबो यांच्याविरोधात २०२२ साली जुलैमध्ये त्यांनी काँग्रेसमधून फुटण्याच्या आधी प्रयत्न केला तेव्हा सादर केली होती. त्यावेळी फुटीसाठी आवश्यक दोन तृतीयांश म्हणजेच आठ आमदारांचे संख्याबळ न झाल्याने फूट बारगळली. मायकल लोबो हे त्यावेळी विरोधी पक्षनेते होते. त्यांना या पदावरून दूर केले जात असल्याचे पत्रही पाटकर यांनी त्यावेळी सभापतींना दिले होते. परंतु, आलेक्स सिक्वेरा यांच्या रुपाने आठवा आमदार या गटाला मिळाल्यावर सप्टेंबर २०२२ रोजी प्रत्यक्ष फूट पडली व आठ काँग्रेसी आमदारांनी विधिमंडळ पक्षच भाजपात विलीन केला. या आठही फुटिरांविरुध्दच्या मूळ अपात्रता याचिका अजून सुनावणीस यावयाच्या आहेत.