पणजी : अलिकडेच मंत्रिपद गमावलेले भाजपाचे ज्येष्ठ आमदार फ्रान्सिस डिसोझा यांच्यावर अमेरिकेतील इस्पितळात उपचार पूर्ण झाले आहेत. डिसोझा यांच्या शरीराचे यापुढे आठवडाभरात स्कॅनिंग केले जाईल व त्यानंतर ते डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच गोव्यात परतू शकतील. डिसोझा यांच्याशी लोकमतच्या प्रतिनिधींनी फोनवरून गुरुवारी अमेरिकेत संपर्क साधला तेव्हा त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. न्यूयॉर्कमधील ज्या स्लोन केटरींग फाऊंडेशन इस्पितळात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी उपचार घेतले होते, त्याच इस्पितळात डिसोझा यांच्यावर उपचार सुरू होते.
डिसोझा यांच्या आजाराची कल्पना आल्यानंतर पर्रीकर यांनीच डिसोझा यांच्या उपचारांची व्यवस्था अमेरिकेतील इस्पितळात केली होती. डिसोझा हे आजारी असल्याने अलिकडेच त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची वेळ मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यावर आली. भाजपा श्रेष्ठींचा तसा निर्णय होता.
डिसोझा म्हणाले, की आपल्याला काही पूर्णवेळ इस्पितळात रहावे लागत नाही. डोस घेण्यापुरते इस्पितळात जावे लागते. बाकीचा वेळ मी मोकळा असतो. तुम्ही हेच उपचार मुंबईच्या इस्पितळात देखील घेऊन पुन्हा अमेरिकेत येऊ शकता असे मला अमेरिकेतील डॉक्टरांनी सांगितले होते. तथापि, पुन्हा-पुन्हा मोठा विमान प्रवास नको,असा विचार करून मी अमेरिकेतच थांबलो. अमेरिकेत आता उपचार पूर्ण झाले आहेत. 10 ऑक्टोबरपर्यंत उपचार पूर्ण होतील, असे डॉक्टरांनी मला सांगितले होतेच.
आता मला खूप बरे वाटते. प्रकृती सुधारली आहे असे डॉक्टरांनीही सांगितले आहे. मात्र यापुढे शरीराचे स्कॅनिंग केले जाईल. सुधारणांबाबत कितपत प्रगती झाली आहे ते डॉक्टर स्कॅनिंग करून सांगतील व मग मी गोव्यात परतण्याचा निर्णय घेईन. कदाचित आणखी आठ-दहा दिवस अमेरिकत रहावे लागू शकते.